३४०० ग्रामसाधन व्यक्तींना नियमित रोजगार द्या; सामाजिक सुरक्षेसह ठोस धोरणाची मागणी
३४०० ग्रामसाधन व्यक्तींना नियमित रोजगार द्या; सामाजिक सुरक्षेसह ठोस धोरणाची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांना ग्रामसाधन व्यक्तींचे निवेदन
मुंबई प्रतिनिधी : - महाराष्ट्रातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सामाजिक अंकेक्षणासाठी कार्यरत असलेल्या सुमारे ३४०० ग्रामसाधन व्यक्तींना नियमित रोजगार, सामाजिक सुरक्षा आणि भविष्यातील रोजगाराची हमी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. यावेळी गणेश काळे, शेख रज्जाक, बाजीराव ढाकणे यांची उपस्थिती आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी तातडीने सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना पत्र दिले आणि याविषयी मी पाठपुरावा करेल असे आश्वासन दिले आहे असे गणेश काळे यांनी सांगितले आहे.
ग्रामपातळीवर शासनाच्या विविध योजनांमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकसहभाग सुनिश्चित करण्यासाठी ग्रामसाधन व्यक्ती महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. सामाजिक अंकेक्षणासाठी आवश्यक प्रशिक्षण घेऊन प्रत्यक्ष क्षेत्रात काम केलेल्या या मनुष्यबळाला मात्र अनेकदा अत्यल्प कालावधीसाठी काम मिळते आणि त्यानंतर बेरोजगारीला सामोरे जावे लागते. विशेषतः बीड जिल्ह्यात नियुक्त असलेल्या सुमारे १०० ग्रामसाधन व्यक्तींना मागील तीन वर्षांत अत्यल्प कालावधीसाठी काम मिळाले असून त्यानंतर काम बंद असल्याने त्यांच्या कुटुंबांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. असे गणेश काळे यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर ग्रामसाधन व्यक्तींना केवळ हंगामी काम न देता वर्षभर नियमित काम उपलब्ध करून देणे, सामाजिक अंकेक्षणासाठी वार्षिक कार्यकॅलेंडर निश्चित करणे आणि शासनाच्या विविध ग्रामीण विकास योजनांच्या सामाजिक देखरेखीची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्याची मागणी करण्यात आली.
प्रमुख मागण्या
निवेदनाद्वारे महाराष्ट्रातील सुमारे ३४०० ग्रामसाधन व्यक्तींना नियमित रोजगाराची हमी देण्यात यावी, सामाजिक अंकेक्षणाचे काम वर्षभर सुरू ठेवून त्यासाठी वार्षिक कार्यकॅलेंडर जाहीर करावे, तसेच ग्रामसाधन व्यक्तींच्या जबाबदारी व क्षेत्रीय कामाचा विचार करून मानधनात सन्मानजनक वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच ग्रामसाधन व्यक्तींना अपघाती विमा व सामाजिक सुरक्षा संरक्षण, क्षेत्रभेटीसाठी स्वतंत्र प्रवास व दैनिक भत्ता अशी मागणीही करण्यात आली.
ग्रामसाधन व्यक्तींच्या अनुभवाचा विचार करून भविष्यातील सामाजिक अंकेक्षण, सर्वेक्षण, जनजागृती व शासनाच्या योजनांच्या पडताळणीसाठी त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे. तसेच प्रशिक्षित ग्रामसाधन व्यक्तींना दीर्घकाळ बेरोजगार ठेवण्याऐवजी त्यांच्या अनुभवाचा शासनाने उपयोग करून घेण्यासाठी स्वतंत्र संवर्ग अथवा विशेष पदनिर्मिती करून नियमित शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी ठोस मागणी करण्यात आली.
बीड जिल्ह्यातील १०० ग्रामसाधन व्यक्तींना नियमित काम देण्याची मागणी केली आहे.
बीड जिल्ह्यातील परिस्थितीचा विशेष उल्लेख करत, जिल्ह्यात नियुक्त असलेल्या सुमारे १०० ग्रामसाधन व्यक्तींना तातडीने काम उपलब्ध करून देण्यासाठी विशेष सामाजिक अंकेक्षण अभियान राबवावे अशी मागणी करण्यात आली.
“काम नाही तर उत्पन्न नाही” या परिस्थितीत ग्रामसाधन व्यक्तींना वर्षानुवर्षे बेरोजगार ठेवणे अन्यायकारक असून, शासनाने केवळ आश्वासन न देता वेळबद्ध शासन निर्णय घेऊन रोजगार, मानधन, विमा आणि सामाजिक सुरक्षा याबाबत ठोस अंमलबजावणी करावी, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चा करताना गणेश काळे, शेख रज्जाक आणि बाजीराव ढाकणे यांची उपस्थिती होती. ग्रामसाधन व्यक्तींच्या प्रश्नावर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
Comments
Post a Comment