पाटोदा हादरला! बालिकेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ नाळवंडी बंद
पाटोदा हादरला! बालिकेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ नाळवंडी बंद
दहा वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचाराने संतापाचा उद्रेक; आरोपींवर कठोर कारवाईसाठी गावकऱ्यांचा एल्गार
पाटोदा (गणेश शेवाळे ) पाटोदा तालुक्यातील नाळवंडी येथे दहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार झाल्याच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. निष्पाप बालिकेवर झालेल्या या अमानुष कृत्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप असून, घटनेच्या निषेधार्थ आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नाळवंडी गाव बंद पुकारण्यात आले.अवघ्या दहा वर्षांच्या बालिकेवर अत्याचार होणे ही केवळ एका कुटुंबाची वेदना नसून, संपूर्ण समाजाच्या काळजाला चटका लावणारी घटना आहे. ज्या वयात चिमुरडीने शाळेत जावे, खेळावे आणि आनंदाने बालपण जगावे, त्या वयात तिच्यावर अत्याचार झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत गावकऱ्यांनी दोषींवर कोणतीही मयामय न दाखवता कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका घेतली आहे. आरोपींना कायद्याच्या कचाट्यातून कोणत्याही परिस्थितीत सुटका मिळता कामा नये, अशी मागणी होत आहे.नाळवंडी बंदमधून प्रशासनाला स्पष्ट संदेश देण्यात आला आहे बालिकांवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही! या प्रकरणाची तातडीने आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच पीडित बालिकेला पूर्ण संरक्षण आणि न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.या घटनेने बालिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. समाजातील विकृत प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment