नमो उद्यानाच्या कामात पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह; चौकशीसाठी बाळासाहेब जावळे यांची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार
नमो उद्यानाच्या कामात पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह; चौकशीसाठी बाळासाहेब जावळे यांची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार
भीमनगर येथील सुरू असलेल्या कामावर माहिती फलक नसल्याचा आरोप; कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी
पाटोदा | प्रतिनिधी
नगरपंचायत पाटोदा यांच्या मार्फत भीमनगर येथे सुरू असलेल्या नमो उद्यानाच्या कामाबाबत नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जावळे यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून सदर कामाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.तक्रारीनुसार, नमो उद्यानाचे काम सुरू असतानाही शासनाच्या नियमांनुसार कामाच्या ठिकाणी कामाचे नाव, मंजूर निधी, कामाची किंमत, ठेकेदाराचे नाव, कामाचा कालावधी व संबंधित विभागाची माहिती दर्शविणारा माहिती फलक (डिस्प्ले बोर्ड) लावण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांना कामाबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यामुळे कामाच्या पारदर्शकतेबाबत संशय निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून, मंजूर अंदाजपत्रक, प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, मोजमाप पुस्तिका (एम.बी.), निधी खर्चाचा तपशील तसेच कामाच्या गुणवत्तेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.तसेच कामाच्या ठिकाणी तात्काळ माहिती फलक लावण्याचे आदेश देण्यात यावेत आणि चौकशीत अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी व ठेकेदाराविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बाळासाहेब जावळे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत केली आहे.
Comments
Post a Comment