थेरला जिल्हा परिषद शाळेची वर्गखोलीची भिंत मध्यरात्री कोसळली, मोठा अनर्थ टळला

थेरला जिल्हा परिषद शाळेची वर्गखोलीची भिंत मध्यरात्री कोसळली; मोठा अनर्थ टळला

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे निधीची मागणी : डॉ. गणेश ढवळे
पाटोदा : (दि. २५)पाटोदा तालुक्यातील तांबा राजुरी केंद्रांतर्गत थेरला येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या जीर्ण झालेल्या वर्गखोलीची भिंत व छत गुरुवारी (दि. २३) मध्यरात्री कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने त्यावेळी शाळेला सुटी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे जिल्हा परिषद शाळांच्या धोकादायक अवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या शाळेचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या निधीतून तरतूद करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य) डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी पालकमंत्री सुनेत्रा पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रेहमान आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

थेरला येथील इयत्ता दहावीपर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेत सुमारे २३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सन १९६५ मध्ये बांधण्यात आलेल्या शाळेतील पाच वर्गखोल्या अत्यंत जीर्ण झाल्या असून त्यांच्या दुरुस्ती अथवा नव्या बांधकामाची मागणी मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीकडून वारंवार करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले.

दरम्यान, पाच नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम अद्याप अपूर्ण असल्याने विद्यार्थ्यांना मोडकळीस आलेल्या जुन्याच वर्गखोल्यांमध्ये बसविण्याची वेळ शिक्षकांवर आली होती. पावसाळ्यात धोका अधिक वाढला असतानाच गुरुवारी मध्यरात्री एका वर्गखोलीची भिंत व छत कोसळले. सुदैवाने शाळा बंद असल्याने मोठी दुर्घटना टळली.

शाळेच्या दुरवस्थेबाबत वारंवार पाठपुरावा केला – प्रताप काळे (मुख्याध्यापक)

शाळेचे मुख्याध्यापक प्रताप काळे यांनी सांगितले की, शाळेच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाला वेळोवेळी कळविण्यात आले होते. मात्र उन्हाळ्यात आवश्यक दुरुस्ती करण्यात आली नाही. भिंत कोसळल्यानंतर संबंधित वर्गात विद्यार्थ्यांना बसविणे शक्य नसल्याने त्यांना नवीन बांधकाम सुरू असलेल्या वर्गखोल्यांमध्ये बसविण्यात आले आहे. मात्र तेथे फळा, बसण्याची व्यवस्था व इतर मूलभूत सुविधा अपुऱ्या असल्याने अध्यापनात अडचणी येत आहेत. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली आहे.

"लेकरांचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?" – गणेश राख (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती)

"राष्ट्रसंत भगवान बाबा दोन दिवस गावात मुक्कामी राहिले होते. त्यांच्या शुभहस्ते लोकवर्गणीतून या शाळेची उभारणी झाली. आज हीच शाळा मोडकळीस आली आहे. पालकांनी वारंवार शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. आमच्या लेकरांचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार आहे का?" असा संतप्त सवाल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश राख यांनी केला. तसेच शाळेच्या नवीन इमारतीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.

जिल्हा वार्षिक नियोजन निधीतून ४१ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी

डॉ. गणेश ढवळे यांनी पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे जिल्हा वार्षिक नियोजन निधीतून अतिरिक्त ४१ कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी केली आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील ५८ इमारतविरहित जिल्हा परिषद शाळा आणि ३०२ शाळांमधील ४७५ वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी ५७ कोटी रुपये, तसेच २९० वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी १२ कोटी रुपये, असा एकूण ६९ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर जिल्हा परिषद बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रेहमान यांनी जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या निधीतून २८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र उर्वरित ४१ कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्यात यावा, अशी मागणी डॉ. ढवळे यांनी केली आहे.

डॉ. ढवळे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षक व विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत. त्यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी आवश्यक निधी उपलब्ध करून धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, दुरुस्ती आणि नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्यात यावे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी