मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्सच्या 'उद्योगरत्न' पुरस्कारासाठी वैजनाथअप्पा (बबन) कोल्हे यांची निवड

मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्सच्या 'उद्योगरत्न' पुरस्कारासाठी वैजनाथअप्पा (बबन) कोल्हे यांची निवड

संघर्ष, प्रामाणिकपणा आणि सेवाभावाचा गौरव
संघर्ष हा यशाचा पाया असतो आणि सेवा ही यशाची खरी उंची असते, या उक्तीचा प्रत्यय श्री वैजनाथअप्पा उर्फ बबन लक्ष्मणअप्पा कोल्हे यांच्या जीवनप्रवासाकडे पाहिल्यावर प्रकर्षाने येतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून, कोणताही आर्थिक वारसा किंवा मोठे भांडवल नसताना केवळ अथक परिश्रम, प्रामाणिकपणा, चिकाटी आणि ग्राहकांप्रती असलेल्या निष्ठेच्या बळावर त्यांनी उभे केलेले 'शिवम् सुपर मार्केट' हे आज परळी वैजनाथ शहरातील यशस्वी उद्योजकतेचे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
त्यांचा जन्म अत्यंत सामान्य कुटुंबात झाला. आई-वडील मोलमजुरी करून संसाराचा गाडा ओढत होते. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यातच लहान भावाच्या अपघाती निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या कठीण प्रसंगात अवघ्या १२ व्या वर्षी, शिक्षण घेत असतानाच कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी त्यांनी एका किराणा दुकानात नोकरी स्वीकारली. बालवयातच जबाबदारीचे ओझे खांद्यावर घेत त्यांनी कष्टालाच जीवनाचे ध्येय मानले.
सुरुवातीची तब्बल १६ वर्षे त्यांनी किराणा व्यवसायात प्रामाणिकपणे काम करत व्यवसायातील प्रत्येक बारकावा आत्मसात केला. ग्राहकांचा विश्वास कसा जिंकायचा, दर्जेदार मालाचे महत्त्व काय, व्यापारी व्यवहारातील प्रामाणिकपणा आणि सेवाभाव कसा जपायचा, हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून शिकले. हाच अनुभव त्यांच्या पुढील यशाचा भक्कम पाया ठरला.
सन १९९६ मध्ये कोणत्याही मोठ्या भांडवलाशिवाय त्यांनी रस्त्याच्या कडेला छोट्याशा स्वरूपात हैदराबाद बँक धरणीकर रोड येथे किराणा विक्री सुरू केली. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, परंतु जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी ग्राहकांचा विश्वास जिंकला. "दर्जेदार माल, योग्य दर आणि प्रामाणिक व्यवहार" हीच त्यांची ओळख बनली.
या विश्वासाच्या बळावर त्यांनी २००८ मध्ये अत्याधुनिक 'शिवम् सुपर शॉपी' सुरू केली. ग्राहकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे व्यवसाय सातत्याने विस्तारत गेला. आधुनिक व्यवस्थापन, ग्राहकाभिमुख सेवा आणि गुणवत्तेची तडजोड न करण्याची भूमिका यामुळे शिवम् सुपर शॉपीने परळी शहरात वेगळी ओळख निर्माण केली.
व्यवसायाचा हा प्रवास २१ फेब्रुवारी २०२५ रोजी एका ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला. नाथ टॉकीज रोड, जत्रा मैदान, परळी वैजनाथ येथे त्यांनी भव्य, आधुनिक आणि सर्व सुविधांनी सुसज्ज 'शिवम् सुपर मार्केट' उभारले. आज हे सुपर मार्केट परळी शहरातील अग्रगण्य व्यावसायिक केंद्रांपैकी एक म्हणून ओळखले जाते. आधुनिक सुविधा, शेकडो दर्जेदार उत्पादने, ग्राहकांना मिळणारी विश्वासार्ह सेवा आणि प्रामाणिक व्यवहार यामुळे शिवम् सुपर मार्केटने अल्पावधीतच शहरवासीयांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.
त्यांच्या या यशामागे त्यांच्या पत्नी सौ. चंद्रकलाबाई कोल्हे यांची खंबीर साथ आणि उच्चशिक्षित मुलगा शिवम् कोल्हे याचा आधुनिक दृष्टिकोनही तितकाच महत्त्वाचा आहे. पारंपरिक मूल्ये आणि आधुनिक व्यवस्थापन यांचा सुंदर संगम साधत त्यांनी कौटुंबिक व्यवसाय अधिक सक्षम केला आहे. स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देत त्यांनी सामाजिक उत्तरदायित्वही जपले आहे.
व्यवसायात यश मिळवणे ही एक गोष्ट आहे; मात्र त्या यशाला समाजसेवेची जोड देणे हे त्याहूनही मोठे कार्य आहे. श्री वैजनाथअप्पा कोल्हे हे प्रभू श्री वैद्यनाथ भगवान आणि श्री तिरुपती बालाजी यांचे निस्सीम भक्त आहेत. तसेच ते परळीतील श्री शनी मंदिरात दर अमावास्येला येणाऱ्या हजारो भाविकांना अनेक वर्षांपासून स्वखर्चाने खिचडी प्रसादाचे वाटप करत आहेत. कोणताही गाजावाजा न करता, निस्वार्थ भावनेने सुरू असलेला हा उपक्रम त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे जिवंत उदाहरण आहे. "नरसेवा ही नारायण सेवा" या भारतीय संस्कृतीच्या विचाराला त्यांनी कृतीतून साकार केले आहे.
त्यांचा जीवनप्रवास हा केवळ एका यशस्वी उद्योजकाचा इतिहास नसून, संघर्षावर मात करून स्वप्ने सत्यात उतरविणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद केवळ जिद्द, प्रामाणिकपणा, कष्ट आणि सेवाभाव यांच्या जोरावर मिळू शकते, याचे ते जिवंत उदाहरण आहेत.
याच उल्लेखनीय कार्याची दखल घेत मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्स व नांदेड जिल्हा आडत व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २९ व्या वर्धापन दिन सोहळा व मराठवाडा व्यापारी परिषद निमित्त त्यांची "उद्योगरत्न पुरस्कार" साठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार केवळ त्यांच्या वैयक्तिक यशाचा गौरव नसून, संघर्ष, प्रामाणिकपणा, ग्राहकनिष्ठा, समाजसेवा आणि सामाजिक उत्तरदायित्व या मूल्यांचाही सन्मान आहे.
श्री वैजनाथअप्पा उर्फ बबन लक्ष्मणअप्पा कोल्हे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास असंख्य नवउद्योजकांना नवी दिशा देणारा आहे. त्यांचा व्यवसाय उत्तरोत्तर भरारी घेत राहो, समाजसेवेचा अखंड दीप अधिक तेजाने प्रज्वलित राहो आणि त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळत राहो, हीच प्रभू श्री वैद्यनाथ भगवान आणि श्री तिरुपती बालाजी चरणी मनःपूर्वक प्रार्थना.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी