झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी पाटोदा पंचायत समितीच्या दारात घुमला बँड; निकृष्ट कामांच्या चौकशीसाठी चुंबळी ग्रामस्थांचा संतप्त एल्गार
पाटोदा (प्रतिनिधी) "निवेदनांवर निवेदने दिली, पण प्रशासन जागे झाले नाही... अखेर बँड वाजवतच पाटोदा पंचायत समितीला जागे करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली," अशा संतप्त भावना व्यक्त करत चुंबळी येथील ग्रामस्थांनी गुरुवारी पाटोदा पंचायत समिती कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले. बँडच्या गजरात घोषणाबाजी करत ग्रामस्थांनी निकृष्ट कामांची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार,गावातील समाज मंदिराचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असून इमारतीला तडे गेले आहेत. तसेच दलित वस्तीतील काही विकासकामे प्रत्यक्षात न करता बिले काढण्यात आली असून काही कामांची बिले दोनदा काढण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला. या सर्व प्रकरणाची अनेकदा लेखी तक्रार करूनही प्रशासनाने ठोस कारवाई केली नसल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला.यामुळे ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बँड वाजवत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. "निकृष्ट कामे करणाऱ्यांना पाठीशी घालणार की जनतेला न्याय देणार?" असा थेट सवालहीआंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला केला. आंदोलनादरम्यान पंचायत समिती परिसर घोषणांनी दणाणून गेला.यावेळी संबंधित विकासकामांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, शासनाच्या निधीचा अपव्यय करणाऱ्यांना पाठीशी घालू नये आणि दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
आंदोलनानंतर प्रशासनाने निवेदन स्वीकारून चौकशी करण्याचे आश्वासन दिले. मात्र "आश्वासन नव्हे, आता प्रत्यक्ष कारवाई हवी; अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल," असा इशारा चुंबळी ग्रामस्थांनी दिला.
Comments
Post a Comment