बीडमध्ये २ ऑगस्टला महाराजस्व समाधान शिबीर; नियोजनासाठी प्रशासनाची बैठक
बीडमध्ये २ ऑगस्टला महाराजस्व समाधान शिबीर; नियोजनासाठी प्रशासनाची बैठक
शिबिराच्या नियोजनासाठी महसूल मंत्र्यांकडून निमंत्रित डॉ.योगेश क्षीरसागर यांची उपस्थिती
बीड (प्रतिनिधी)
दि.२३ : राज्य शासनाच्या लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेला चालना देण्यासाठी बीड विधानसभा मतदारसंघासाठी बीड शहरातील अंबिका लॉन्स येथे रविवार, दि.२ ऑगस्ट रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिराच्या प्रभावी नियोजनासाठी गुरुवारी (दि.२३) बीड तहसीलदार कार्यालयात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या शिबिराच्या नियोजनासाठी महसूल मंत्र्यांकडून निमंत्रण असलेले समन्वयक, बीड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी आवश्यक नियोजनाबाबत बैठकीत सविस्तर चर्चा केली.
मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून, राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. सुनेत्राताई पवार आणि पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड महसूल उपविभागाकडून ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ राबविण्यात येत आहे.
राज्यात विधानसभा मतदारसंघनिहाय ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे’ आयोजन करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार बीड विधानसभा मतदारसंघासाठी बीड शहरातील अंबिका लॉन्स येथे रविवार, दि.२ ऑगस्ट रोजी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराच्या नियोजनासाठी बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी महसूल मंत्र्यांकडून निमंत्रित असलेले भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर, बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, नायब तहसीलदार सुहास हजारे, महादेव चौरे तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत बोलताना डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले की, महसूल विभागाच्या नियोजनातून हा उपक्रम राबविण्यात येत असून अशा लोकाभिमुख शिबिरांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासनाच्या विविध सेवा आणि लोककल्याणकारी योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांची भूमिका महत्त्वाची आहे. नागरिकाभिमुख प्रशासनाची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी शासन, प्रशासन आणि जनतेतील समन्वय व विश्वास अधिक दृढ करणारे हे शिबीर ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
नागरिकांच्या तक्रारींची दखल
बैठकीदरम्यान शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध तक्रारींची डॉ. योगेश क्षीरसागर यांनी दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश देत त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला अधिक कार्यक्षमतेने काम करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे अनेक रखडलेल्या प्रशासकीय कामांना गती मिळून नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
Comments
Post a Comment