पाटोद्यातील न झालेल्या कामाचे श्रेय द्यायचे तरी कुणाला?
“पाटोद्यातील न झालेल्या कामाचे श्रेय द्यायचे तरी कुणाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अजूनही प्रतीक्षेत, मांजरा नदीवरील पुलाचे काम दहा वर्षांपासून रखडलेले, शहराला फिल्टरयुक्त शुद्ध पाणीपुरवठाही अद्याप नाही!”
पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा शहरातील अनेक महत्त्वाचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुका आल्या की मोठमोठ्या घोषणा आणि विकासाच्या गप्पा रंगतात, मात्र प्रत्यक्षात शहरातील मूलभूत प्रश्न आजही जैसे थे असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा अनेकदा करण्यात आली. विविध स्तरावर बैठका, आश्वासने आणि राजकीय भाषणे झाली, मात्र प्रत्यक्षात आजपर्यंत पुतळा उभारणीचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे शिवप्रेमी व नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. त्याचप्रमाणे शहरातील मांजरा नदीवरील पुलाचा प्रश्नही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तब्बल दहा वर्षांपासून पुलाच्या कामाबाबत चर्चा, आश्वासने आणि निधीच्या घोषणा होत आहेत, परंतु आजही पुलाचे काम रखडलेलेच आहे. पावसाळ्यात नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.पाटोदा शहराला फिल्टरयुक्त शुद्ध पाणीपुरवठा करण्याची योजनाही आजपर्यंत पूर्णत्वास गेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शहरातील अनेक भागांमध्ये दूषित व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कोट्यवधी रुपयांच्या योजनांची घोषणा झाली, निधी मंजूर झाल्याचे सांगितले गेले, मात्र प्रत्यक्षात नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नसल्याचे वास्तव आहे.एकीकडे शहरातील महत्त्वाची कामे रखडलेली असताना दुसरीकडे विविध स्तरावर श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे “न झालेल्या कामाचे श्रेय द्यायचे तरी कुणाला?” असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. शहराच्या विकासासाठी केवळ घोषणा नव्हे तर प्रत्यक्ष कृतीची गरज असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत असून, रखडलेल्या कामांकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
Comments
Post a Comment