बिंदुसरा नदीपात्र, ओपन स्पेस आणि व्यापारी संकुल अतिक्रमणप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
बिंदुसरा नदीपात्र, ओपन स्पेस आणि व्यापारी संकुल अतिक्रमणप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
“गोरगरिबांवर कारवाई अन् भू-माफियांना अभय का?” – डॉ. गणेश ढवळे
बीड (दि.१८) : बीड शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये भेदभाव होत असल्याचा आरोप करत बिंदुसरा व करपरा नदीपात्रातील अतिक्रमणे, ओपन स्पेस गिळंकृत प्रकरणे तसेच व्यापारी संकुलातील बेकायदेशीर बांधकामांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.१८ सोमवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विभागीय आयुक्त यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविण्यात आले. आंदोलनात शेख युनुस, रामनाथ खोड, रामधन जमाले, बाजीराव ढाकणे, प्राचार्य. डी. जी. तांदळे, डॉ. संजय तांदळे , बाळासाहेब मोरे पाटील, किष्किंधा पांचाळ, सिताबाई भोसले ,सिता दहे, आदी सहभागी झाले होते.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत हातावर पोट भरणाऱ्या चहा-नाश्ता चालक, टपरीधारक, फळविक्रेते, फुलहार विक्रेते आणि फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे बिंदुसरा व करपरा नदीपात्रातील पुररेषेच्या आतील अतिक्रमणे, उद्यान व मंदिरांसाठी राखीव असलेल्या ओपन स्पेसवरील बेकायदेशीर बांधकामे तसेच व्यापारी संकुलातील अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
नगरपालिका अधिकारी, नगररचनाकार, भूमी अभिलेख कार्यालयातील काही व्यक्ती आणि भू-माफियांच्या संगनमतातून अनेक जागा गिळंकृत करण्यात आल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. बनावट पीटीआर आणि पीआर कार्ड तयार करून काही जागा स्वतःच्या नावावर करून घेतल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
“कायदा सर्वांसाठी समान असावा. गोरगरीबांवर कारवाई आणि धनदांडग्यांना संरक्षण, हे प्रशासनाचे दुटप्पी धोरण थांबले पाहिजे,” अशी मागणी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली.
Comments
Post a Comment