पोखरी (घाट) गावातील रस्त्यालगत धोकादायक विहिरींना संरक्षक कठडे बसविण्याची ग्रामस्थांची मागणी; प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात

पोखरी (घाट) गावातील रस्त्यालगत धोकादायक विहिरींना संरक्षक कठडे बसविण्याची ग्रामस्थांची मागणी; प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात – डॉ. गणेश ढवळे
लिंबागणेश (दि.२०): नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे रस्त्यालगतच्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेनंतर राज्यभरात अशा धोकादायक विहिरींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील विविध गावांमध्येही रस्त्यालगत असलेल्या विहिरींबाबत ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार बीड यांना निवेदन देऊन रस्त्यालगत धोकादायक स्थितीत असलेल्या विहिरींची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. संबंधित विहिरींच्या मालकांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संरक्षक भिंत किंवा कठडा उभारण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशीही त्यांनी मागणी केली.

दरम्यान, बीड तालुक्यातील पोखरी (घाट) येथील खिल्लारे वस्ती परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली विहीर अत्यंत धोकादायक अवस्थेत असून तिच्याभोवती कोणतीही संरक्षण व्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या विहिरीमुळे लहान मुले, दुचाकीस्वार, बैलगाड्या तसेच जनावरांच्या जीविताला धोका असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर ध्रुपदी खिल्लारे, गोरख खिल्लारे, मधुकर खिल्लारे, मच्छिंद्र खिल्लारे, बबन खिल्लारे, जालिंदर खिल्लारे, हौसराव खिल्लारे, साहेबराव धुमाळ, दत्तु खिल्लारे यांसह खिल्लारे, मुळीक व झांजुर्णे वस्तीवरील ग्रामस्थांनी संबंधित विहिरीला तातडीने संरक्षक कठडा किंवा भिंत उभारण्याची मागणी केली आहे.

ग्रामस्थांनी “दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने उपाययोजना कराव्यात,” अशी ठाम भूमिका घेतली असून, याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी