अहमदपूर–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठ्या भेगा; कंत्राटदारांचा डांबराने ठिगळं लावण्याचा केविलवाणा प्रयत्न! कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी
अहमदपूर–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठ्या भेगा;
कंत्राटदारांचा डांबराने ठिगळं लावण्याचा केविलवाणा प्रयत्न! कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी :- डॉ.गणेश ढवळे
लिंबागणेश (दि.२९): बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या अहमदपूर–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असुन ठिकठिकाणी पडलेल्या भेगा, तडे आणि खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सुमारे १७० किलोमीटर लांबीच्या आणि ८७८ कोटी रुपये खर्चाच्या या महामार्गावर मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान विशेषतः रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. दुचाकी वाहनांचे चाक खड्ड्यांमध्ये अडकून अपघात होत असल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या संदर्भात तक्रारी करूनही ठोस उपाययोजना न करता संबंधित कंत्राटदार एचसीपीएल कडून केवळ डांबर टाकून खड्डे बुजवण्याचा तात्पुरता केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. ही मलमपट्टी तात्पुरती स्वरूपाची दुरुस्ती असल्याने समस्या कायमच राहार आहे.
दरम्यान, मांजरसुंभा ते अंबेजोगाई दरम्यान एचपीएम कंपनीकडील कामही रखडलेल्या अवस्थेत आहे. दुभाजक, पथदिवे, दिशादर्शक फलक आणि रस्त्यालगतच्या नाल्यांचे काम अपूर्ण असल्याने स्थानिक नागरिक व दुकानदारांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार लेखी तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने ठेकेदारांचा बेजबाबदारपणा वाढल्याचा आरोप होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रस्त्यांची सिमेंट ब्लॉक कट पद्धतीने कायमस्वरूपी व दर्जेदार दुरुस्ती करावी, तसेच अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्य डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केली आहे.
Comments
Post a Comment