श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान येथील हरिनाम सप्ताहाची ‘काल्याच्या किर्तनाने’ भक्तिमय सांगता.
"बेलेश्वर येथे भक्तांचा तुडूंब महा जनसागर लोटला"
श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान येथील हरिनाम सप्ताहाची ‘काल्याच्या किर्तनाने’ भक्तिमय सांगता.
बीड प्रतिनिधी :-तालुक्यातील बेलगाव येथील श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान येथे महाशिवरात्र महोत्सवानिमित्त दि.९ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची आज दि.१६ रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणात सांगता झाली. सप्ताहाच्या सांगता सोहळ्यानिमित्त बेलेश्वर येथे भक्तांचा तुडूंब महासागर लोटला होता.
गुरुवर्य महंत मठाधिपती महादेव भारती महाराज व मठाधिपती शांतीब्रम्ह तुकाराम भारती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह उत्साहात पार पडला. सांगता प्रसंगी शांतीब्रम्ह तुकाराम भारती महाराज यांच्या सुश्राव्य, अमृततुल्य दहिहंडी कार्यक्रम अर्थात ‘काल्याच्या किर्तनाने’ उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
यावेळी मोरेश्वर संस्थान, कोळवाडी येथील मठाधिपती हरिहर भारती महाराज, बबन महाराज मंझरीकर, भक्तिदास महाराज शिंदे (बेलखंडी, पाटोदा), रणजित महाराज शिंदे (नेकनुर) यांची प्रमुख उपस्थिती होती.
कीर्तनादरम्यान त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील —
“तुझिये संगति! जाली आमुची निश्चिंति!
नाही देखिले ते मळे! भोग सुखाचे सोहळे!!
घरी ताकांचे सरोवर! येथे नवनीताचे पुर!!
तुका म्हणे आतां! आम्ही न वजो दवडितां!!”
या अभंगाच्या माध्यमातून गोपाळ आणि भगवंतातील गोड संवादाचे रसाळ वर्णन केले. “भगवंताची संगत लाभल्यावर मन निश्चिंत होते. कोणतीही चिंता, अपेक्षा किंवा अपूर्णता उरत नाही. भोग आणि सोहळा यात फरक आहे; परंतु भगवंताच्या संगतीत सुखाचा केवळ भोग नव्हे, तर आनंदसोहळाच प्राप्त होतो,” असे त्यांनी सांगितले.
तसेच भगवान श्रीकृष्ण यांच्या बाललीलांपासून ते अवतारसमाप्तीपर्यंतच्या जीवनप्रवासावर प्रबोधन करत “हे विश्वच माझे घर” या तत्वज्ञानाचा गोड संदेश दिला. परमात्म्याचे नामस्मरण, समभाव आणि विश्वबंधुत्व हीच खरी भक्ती असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
या सप्ताहाच्या सांगता सोहळ्यास विधानसभेतील नेते मंडळी देखील उपस्थित होती. बीड शिवसेनेचे जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर, भाजपचे डॉ. योगेश क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के तसेच लिंबागणेश सर्कलचे युवानेते संजय पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून दर्शन व कीर्तनाचा लाभ घेतला.
Comments
Post a Comment