विस्तारित कार्यकारिणी सभेत संघटन बळकटीवर भर- डॉ.कैलास भाऊ कदम महाराष्ट्र इंटक प्रदेशाध्यक्ष
मुंबई (प्रतिनिधी) – राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र राज्य यांची विस्तारीत कार्यकारिणी सभा रविवारी दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय मिल मजदूर संघ, मामा फाळके सभागृह, मजदूर मंजिल, परेल, मुंबई येथे उत्साहात संपन्न झाली.
सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम होते. यावेळी सरचिटणीस मा. गोविंद मोहिते, चिटणीस मुकेश तिगोटे यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांनीही सभेला उपस्थित राहून जिल्ह्यातील कामगारांच्या प्रश्नांवर आपली भूमिका मांडली.
या बैठकीत राज्यातील कामगारांच्या प्रलंबित मागण्या, नव्या कामगार कायद्यांमुळे निर्माण झालेली परिस्थिती, कंत्राटी कामगारांचे प्रश्न, वेतनवाढ, सामाजिक सुरक्षा योजना आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटन अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
डॉ. कैलास कदम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कामगार हक्कांच्या संरक्षणासाठी एकजूट आणि संघटन बळकटीची गरज अधोरेखित केली. तर सरचिटणीस गोविंद मोहिते यांनी राज्यभर संघटन विस्तार व सदस्य नोंदणी मोहिमेला गती देण्याचे आवाहन केले.
सभेचा समारोप संघटन एकजुटीच्या निर्धाराने करण्यात आला. महाराष्ट्रातील कामगारांच्या हक्कांसाठी इंटक अधिक तीव्र आणि संघटितपणे लढा उभारेल, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
Comments
Post a Comment