नगरपरिषद सीओ, बदली मागू नका!बीड शहर बचाव मंचाची शैलेश फडसे यांना विनंती



बीड प्रतिनिधी : बीड शहर बचाव मंचाच्या वतीने विविध पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपरिषद बीडचे मुख्याधिकारी (सीओ) शैलेश फडसे यांची भेट घेऊन त्यांनी बदली मागू नये, अशी विनंती केली. बीड शहराच्या विकासासाठी त्यांच्या कार्यपद्धतीची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

सीओ शैलेश फडसे यांनी बीडमध्ये रुजू झाल्यापासून नगरपरिषदेच्या कामकाजात शिस्त व पारदर्शकता आणण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत. गत मुख्याधिकारी यांच्या कार्यकाळानंतर नगरपालिकेचा कारभार सुरळीत करण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर होते. मात्र, त्यांनी कर्तव्यदक्ष आणि नियोजनबद्ध पद्धतीने प्रशासनाची धुरा सांभाळत कामकाजाला गती दिली आहे. नगरपरिषदेच्या कार्यप्रणालीत सुधारणा घडवून आणण्याचे त्यांचे प्रयत्न आता फलदायी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.

विशेषतः नगरपरिषद व्यवस्थेत रूढ झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रवृत्तींवर आळा घालण्यासाठी तसेच बोगस कंत्राटदार व बोगस बिलांविरोधात उघडलेल्या मोहिमेबद्दल बीड शहर बचाव मंचाच्या वतीने त्यांचे मनापासून कौतुक करण्यात आले. त्यांच्या धाडसी आणि निडर भूमिकेमुळे प्रशासनात सकारात्मक बदल होत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

“आपण अशाच धैर्याने व प्रामाणिकपणे काम करत राहा. कोणत्याही संकटाच्या वेळी आम्ही आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहू,” असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त करून त्यांचे मनोबल वाढविले.

यावेळी नगर रोड माने कॉम्प्लेक्स परिसरातील उद्यानाच्या समस्या, काही भागांतील स्ट्रीट लाईट अडचणी तसेच सय्यद अलीनगर येथील दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील मूलभूत सुविधांबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

सीओ शैलेश फडसे यांनी आतापर्यंत विविध शहरांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तसेच नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून बजावलेल्या उत्कृष्ट कर्तव्याबद्दल त्यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.

बीड शहराला पूर्णवेळ व जबाबदारीने काम करणाऱ्या अधिकाऱ्याची आवश्यकता असून, फडसे यांसारख्या कार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे प्रशासनावर नागरिकांचा विश्वास दृढ होत असल्याचे मत बैठकीत व्यक्त झाले.

या बैठकीस बीड शहर बचाव मंचाचे अध्यक्ष नितीन जायभाये, कायदेशीर सल्लागार ॲड. अनिल बारगजे, एसडीपीआय पक्षाचे जिल्हा सचिव अब्दुल कादर, आपचे शहराध्यक्ष सादेक सय्यद, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य भूषण पवार, सामाजिक कार्यकर्त्या आम्रपाली साबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी