प्रकाश आंबेडकर नगर व रमाई कॉलनीत रस्ता, नाली व सार्वजनिक शौचालय उभारणीला हिरवा कंदील – शैलेश फडसे
प्रकाश आंबेडकर नगर व रमाई कॉलनीत रस्ता, नाली व सार्वजनिक शौचालय उभारणीला हिरवा कंदील – शैलेश फडसे
डॉ. योगेश क्षीरसागर, डॉ. सारिका क्षीरसागर यांच्या पुढाकारासह अशोक वीर यांच्या पाठपुराव्याला यश
बीड (प्रतिनिधी) – बीड शहरातील इमामपूर रस्त्यावरील प्रकाश आंबेडकर नगर व रमाई कॉलनी परिसरातील प्रलंबित प्रश्नांबाबत नागरिकांनी डॉ. योगेश क्षीरसागर व डॉ. सारिका क्षीरसागर यांच्याकडे कैफियत मांडली होती. या मागण्यांना त्यांनी तात्काळ प्राधान्य देत मुख्याधिकारी (सीओ) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विषयावर लक्ष केंद्रित केले. त्यानुसार वॉर्ड क्र. २६ मधील बार्शी रोड ते इमामपूर रोड जोडणाऱ्या सुमारे ६०० मीटर रस्त्याचे डांबरी/सिमेंट काँक्रीट बांधकाम, नाली व सार्वजनिक सुलभ शौचालय उभारणीची कामे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी दिली.
बहिरवाडी चे माजी सरपंच तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन उभारणीचे प्रणेते अशोक वीर यांनी या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना आणि लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराला यश आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
सध्या या मार्गावर मुरुम टाकून तात्पुरता रस्ता करण्यात आला असला तरी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात चिखल साचतो. परिणामी शाळा, लॉ कॉलेज, यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेज येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच रमाई कॉलनी, आंबेडकर नगर, डोले वस्ती, हनुमान नगर व इमामपूर परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते. विटभट्ट्यांकडे जाणारी वाहतूकही याच मार्गावरून होत असल्याने रस्त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे.
या भागात प्रामुख्याने सर्वसामान्य व मागासवर्गीय कुटुंबे वास्तव्यास आहेत. यापूर्वी अध्यक्षांच्या पुढाकारातून पाण्याची टाकी उभारून मोफत नळजोडणी देण्यात आली होती, ज्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. आता रस्ता, नाली व सार्वजनिक शौचालय उभारणीमुळे मूलभूत सुविधांचा आणखी बळकटीकरण होणार आहे.
“वार्डमधील सर्व प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडविण्याची आमची भूमिका आहे,” असे डॉ. योगेश क्षीरसागर व डॉ. सारिका क्षीरसागर यांनी स्पष्ट केले होते. तर “या कामांमुळे नागरिकांची मोठी गैरसोय दूर होईल,” अशी प्रतिक्रिया अशोक वीर यांनी व्यक्त केली.
लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याने प्रकाश आंबेडकर नगर व रमाई कॉलनी परिसरात समाधान व आनंदाचे वातावरण पसरले आहे.
Comments
Post a Comment