बीडमध्ये ‘माझी आई नानीबाई आदर्श माता’ पुरस्कार सोहळा उत्साहात; जिल्हास्तरीय स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम दिमाखात संपन्न
बीडमध्ये ‘माझी आई नानीबाई आदर्श माता’ पुरस्कार सोहळा उत्साहात; जिल्हास्तरीय स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम दिमाखात संपन्न
बीड | प्रतिनिधी
सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक विद्यालय, बीड येथे स्वर्गीय वामनदादा पवार यांच्या स्मरणार्थ आयोजित जिल्हास्तरीय रंगभरण व निबंध लेखन स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा तसेच ‘माझी आई नानीबाई आदर्श माता’ पुरस्कार वितरण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या थाटामाटात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादासाहेब मुंडे होते. प्रमुख व्याख्याते म्हणून पांडुरंग सुतार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मातृत्वाचे महत्त्व, संस्कारांची परंपरा आणि शिक्षणाची गरज यावर प्रभावी भाष्य केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थितांना नवी ऊर्जा मिळाली.
या सोहळ्यात सौ. सविता मोहनराव रणदिवे (अकलूज) व सौ. कांता संतोष सोनवणे यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच सौ. मीनाक्षी भास्कर वडमारे, श्रीमती सविता मनोहर पंडित आणि सौ. शकुंतला किसन शीलवंत यांना ‘आदर्श माता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना उपस्थितांच्या टाळ्यांच्या कडकडाटात सन्मानित मातांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, पीएसआय प्रवीणकुमार बांगर, शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष दीपक घुमरे, ॲड. विश्वनाथ मगर, नगरसेवक प्रमोद अण्णा शिंदे, आरती रणजीत बनसोडे, सुभाष पवळ, महादेव काळे, बाबासाहेब धुताडमल, वैभव स्वामी, रोहिदास रोहिटे, वशिष्ठ बडे सर व किशोर घोडके यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन सचिव उत्तम पवार, संचालक बाबूलाल पवार, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या आणि मातृत्वाचा सन्मान करणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, सन्मानित मातांच्या डोळ्यांतील अभिमान आणि उपस्थित मान्यवरांच्या प्रेरणादायी शब्दांनी हा सोहळा संस्मरणीय ठरला.
Comments
Post a Comment