राज्य परिवहन महामंडळाने पत्रकारांची राखीव जागा शेवटच्या सीटवर ढकलली
राज्य परिवहन महामंडळाने पत्रकारांची राखीव जागा शेवटच्या सीटवर ढकलली
सरकार पत्रकारांना त्यांची हक्काची सवलत देतय की जाणिवपूर्वक अपमान करतयं?
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचा राज्यकर्त्यांना सवाल
मुंबई- राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये अधिस्विकृती पत्रकारांना पूर्वी 11 व 12 नंतर 25 व 26 राखीव सीट वरून येत्या 1 जानेवारीपासून 27 व 28 नंबरवर राखीव जागा निश्चितीचा निर्णय घेतला असून महामंडळाचा हा निर्णय म्हणजे आपल्या योजनांच्या माध्यमातून विविध घटकांसाठी आम्ही खूप करतो असा प्रसिद्धीचा आव आणायचा आणि मिरवून घ्यावयाचे. मात्र ‘नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा’ असेच यांचे प्रदर्शन असून पत्रकारांना शेवटचे सीट देण्याची कृती ही अपमानास्पद वागणूक असून अजून पत्रकारांचा किती अपमान करणार? जाहीर केलेली हक्काची सीटही पत्रकारांना कधीच उपलब्ध नसते. सरकार पत्रकारांना हक्काची सवलत देतय की जाणिवपूर्वक अपमान करतय? असा सवाल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी सरकारला केला आहे.
मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की, एस.टी. महामंडळाच्या या कृतीबद्दल मराठी पत्रकार परिषदेने गंभीर दखल घेतली असून मुख्यमंत्री महोदयांकडे तक्रार करणार आहोत. ठरवून पत्रकारांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. सरकारी विश्रामगृहातही पत्रकारांना शेवटचे स्थान दिले आहे. एस.टी. महामंडळातही आहे ते आधीचे स्थान हिरावून धक्के खाण्यासाठी पत्रकारांना शेवटचे सिट देणार आहेत. दिव्यांगांना मागच्या सीटवरून पुढे 3,4,5 क्रमांकावर आणले. शासनाच्या या कृतीचे आम्ही स्वागतच करतो. परंतु पत्रकारांना आहे त्या जागेवर कायम न ठेवता शेवट ढकलणेविषयी पत्रकारांनी तुमचे काय घोडे मारले? असाही संतप्त सवाल एस.एम. देशमुख यांनी केला असून महामंडळाच्या प्रवासी बसमध्ये आमदारांसाठी राखीव जागा म्हणजे, ‘अति झालं हसू आलं’ असाच प्रकार असून हा विनोदच आहे. या राखीव जागेचा किती आमदार फायदा घेतात? तेही महामंडळाने जाहीर करावे असे एस.टी. ने प्रवास करणाऱ्या आमदारांचे हारतुरे घेऊन स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत. एस.टी. महामंडळाच्या सोयीसवलतींचे पितळ उघडं पडले आहे हीच खरी वस्तुस्थिती असल्याचे एस.एम. देशमुखयांनी म्हटले आहे.
Comments
Post a Comment