लोकनेते विनायकराव मेटे साहेबांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त आज अभिवादन कार्यक्रम
लोकनेते विनायकराव मेटे साहेबांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त आज अभिवादन कार्यक्रम
बीड( प्रतिनिधी) लोकनेते स्वर्गीय विनायकराव मेटे साहेब यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त बीड शहरातील कॅनॉल रोड परिसरातील त्यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार असून, मेटे साहेबांवर प्रेम करणारे सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांनी आपल्या राजकीय व सामाजिक जीवनात समाजहिताचे अनेक प्रश्न सातत्याने लावून धरले आणि ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. बीड शहरातील कंकालेश्वर मंदिर तसेच शाही शहनशावली दर्ग्याला दर्जा मिळवून देत विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून देणे, शहरातील प्रमुख रस्त्यांचे मजबुतीकरण, श्रीक्षेत्र नारायणगडाच्या विकासाला गती देणे तसेच पाली येथील शांतीवनाच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
या शिवाय मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठीही त्यांनी सातत्याने संघर्ष केला. समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा सातत्यपूर्ण लढा हीच त्यांच्या सार्वजनिक जीवनाची ओळख राहिली.
१४ ऑगस्ट २०२२ रोजी मराठा आरक्षणा संदर्भातील बैठकीसाठी मुंबईकडे जात असताना त्यांच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात त्यांचे निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने बीडसह संपूर्ण महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आजही भरून निघालेली नाही.
समाजहितासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या महान लोकनेत्याला त्यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन करण्यात येणार असून, त्यांच्या कार्याला उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.
Comments
Post a Comment