सर्प विज्ञानाची जनजागृती मानव जातीच्या प्रगतीसाठी आवश्यक - प्राचार्य सविताताई शेटे
बीड प्रतिनिधी :- दिनांक १३ ऑगस्ट रोजी गुरुकुल पब्लिक स्कूल बीड येथे सर्पविज्ञान प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी शाळेच्या उप मुख्याध्यापिका शर्मिला पाटील , बीड जिल्हा उपाध्यक्ष कॉ प्राचार्य डी जी तांदळे, शाखा कार्याध्यक्ष विजय घेवारे, व्यसन विरोधी प्रबोधन आणि संघर्ष विभागाचे कार्यवाह बाजीराव ढाकणे मंचावर उपस्थित होते.
सर्प विज्ञान या विषयावर डॉ सविता शेटे यांनी मार्गदर्शन केले. सापांचे प्रकार, विषारी आणि बिनविषारी सापांची माहिती , त्यांचे खाद्य, निवास, शरीररचना, सापाचे विष , त्याची उपयुक्तता, साप दिसल्यास काय काळजी घ्यावी , चावल्यास काय करावे अशा सर्व बाबी विषयी त्यांनी माहिती दिली. सापाविषयी असणाऱ्या अंधश्रध्दा, जसे की साप दूध पितो, साप डूख धरतो, साप संगीताच्या तालावर नाचतो, साप गुप्तधनाचे रक्षण करतो इत्यादी अशा अनेक अंधश्रद्धाची माहिती देवून या बाबतचा वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगितला. साप हा पूर्णतः मांसाहारी प्राणी आहे तो दूध पित नाही. दूध हे त्याच्यासाठी विष असते. त्याचा मेंदू अविकसित असल्यामुळे त्याला स्मरण करणे , लक्षात ठेवणे, विचार करणे, गुप्तधनाचे रक्षण करणे या बाबी जमत नाहीत , डूख धरता येत नाही . साप हा आपला शत्रू नसून तो शेतकऱ्यांचा, मानवाचा कसा मित्र आहे हे स्पष्ट केले. पर्यावरण संरक्षणातील त्याचे महत्त्व विषद केले. सण साजरा करताना त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन पाहावा, पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि आनंदाने सण साजरा करावा असे सांगितले. संवादात्मक पद्धतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांनी अत्यंत उस्फूर्त प्रतिसाद दिला.
शेवटी घोषणांनी परिसर दणाणून सोडला त्यामध्ये साप वाचवू या , पर्यावरण वाचवू या अशा घोषणांनी विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी शाखेच्या वतीने सर्पविषयक माहिती देणारे पोस्टर्स शाळेत लावण्यात आले होते, जे अत्यंत कुतूहलाने विद्यार्थ्यांनी पाहिले. त्यावेळी अनेक प्रश्न विचारले. शिक्षकांनीही प्रश्न विचारले, आम्हाला अनेक गोष्टी आज माहीत झाल्या, अशा प्रतिक्रिया दिल्या. या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका ऋतुजा गाडीवान यांनी उत्साहाने पूर्ण सहकार्य केले. उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील यांनी पूर्ण कार्यक्रम आयोजित केला.शाखेचे कार्याध्यक्ष विजय घेवारे यांनी पोस्टर प्रदर्शन लावून विद्यार्थ्यांना माहिती दिली. या वेळी शाळेच्या उप मुख्याध्यापिका शर्मिला पाटील , बीड जिल्हा उपाध्यक्ष कॉ प्राचार्य डी जी तांदळे, शाखा कार्याध्यक्ष विजय घेवारे, शाखा व्यसन विरोधी प्रबोधन आणि संघर्ष विभागाचे कार्यवाह बाजीराव ढाकणे मंचावर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. जवळपास ७०० च्यावर विद्यार्थी आणि ३० ते ३५ शिक्षक या कार्यक्रमास उपस्थित होते.
Comments
Post a Comment