बीड जिल्ह्यातील शाळांमध्ये आठवड्यातून एकदा 'गुड टच-बॅड टच'चे प्रशिक्षण देण्याची मागणी
बीड जिल्ह्यातील शाळांमध्ये आठवड्यातून एकदा 'गुड टच-बॅड टच'चे प्रशिक्षण देण्याची मागणी
बीड जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
बीड प्रतिनिधी :
सध्याच्या काळात लहान मुलींवरील लैंगिक शोषणाच्या आणि अत्याचाराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींना आठवड्यातून एकदा 'गुड टच-बॅड टच'चे प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी महिला अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधीसमिती, महाराष्ट्र राज्य,मराठवाडा उपअध्यक्ष आम्रपाली सचिन साबळे यांनी बीडचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या (प्राथमिक/माध्यमिक) शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नुकत्याच घडलेल्या नसरापूरसारख्या दुर्दैवी घटनेचा संदर्भ देत निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लहान वयात बालकांना चांगल्या व वाईट स्पर्शातील फरक समजण्याइतपत परिपक्वता नसते. योग्य ज्ञानाच्या अभावामुळे आणि भीतीपोटी मुले अशा प्रसंगांना बळी पडतात व घडलेला प्रकार पालकांना सांगू शकत नाहीत.
कोणतीही अनुचित घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा, घटना घडण्यापूर्वीच शालेय स्तरावर सातत्याने जनजागृती करणे गरजेचे आहे. आठवड्यातून एकदा अशा प्रकारचे प्रशिक्षण दिल्यास लहान मुली सतर्क राहतील आणि संभाव्य धोक्यांची माहिती वेळीच घरच्यांना किंवा शिक्षकांना देऊ शकतील.
प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन बीड जिल्ह्यातील सर्व शाळांना याबाबत तत्काळ व कडक आदेश निर्गमित करावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना. सुनेत्राताई पवार आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री मा. ना. आदितीताई तटकरे यांनाही पाठवण्यात आली आहे.
Comments
Post a Comment