संबोधी प्रतिष्ठानतर्फे नवनियुक्त अधिकारी, गुणवंत विद्यार्थी व पदोन्नतीप्राप्तांचा सत्कार संपन्न
बीड प्रतिनिधी :बीड, पुणे व मराठवाड्यात देवगिरी प्रतिष्ठान च्या वतीने तुलशी शैक्षणिक संकुल मार्फत विविध शाखेची विद्यालय, महाविद्यालय व सध्याच्या स्पर्धेत टिकून राहण्याकरता विविध कौशल्यपूर्ण उपयोगी कोर्सेस सुरू करणारे प्रा. प्रदीप रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महामानव अभिवादन ग्रुप बीड व वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालय बीड तसेच संबोधि प्रतिष्ठान बीड विविध प्रकारचे सामाजिक कार्य करीत आहेत. सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने संबोधी प्रतिष्ठान, बीडच्या वतीने नवनियुक्त अधिकारी-कर्मचारी, पदोन्नतीप्राप्त अधिकारी-कर्मचारी तसेच विविध स्पर्धात्मक व व्यावसायिक परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंतांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
संबोधी प्रतिष्ठानच्या द्वितीय वर्धापन दिनाचे औचित्य साधून तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड येथील सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी सखाराम उजगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे, सेवानिवृत्त सी ई ओ पी. व्हि. बनसोडे, प्राचार्य डी.जी. निकाळजे, डॉ. प्रा. उत्तम साळवे, प्रा. डॉ. मनोहर शिरसाट, सांगलीचे शिक्षणाधिकारी नानाभाऊ हजारे, संपादक वैभव स्वामी, उपसंपादक सुनील डोंगरे, महामानव अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम. भोले, मेजर जनरल समता सैनिक दल बीडचे कॅप्टन राजाभाऊ आठवले विचार मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमांना पुष्प व पुष्पहार अर्पण करून आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एम. राऊत यांनी केले, तर प्रास्ताविक संबोधी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा वैशाली शिंदे उजगरे यांनी केले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे नागपूर येथील पूज्य भंते पय्यासिरी यांची अनपेक्षितपणे लाभलेली धम्मदेशना. भंते पय्यासिरी यांनी उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन करत सत्कारमूर्तींना पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिले. संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी उपशिक्षण अधिकारी पदावरून शिक्षणाधिकारीपदी पदोन्नती झाल्याबद्दल नानाभाऊ हजारे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जेएमएफसी पदावर नियुक्त झालेल्या कु. सोनिया अविनाश गंडले, केंद्रप्रमुखपदी पदोन्नती झालेल्या शैलजा ओव्हाळ व सावित्री कांबळे, तलाठीपदी नियुक्त सुमेध भालेराव व कु. प्रज्ञा सरवदे, महसूल सहाय्यक रितिका ससाने, विद्युत ऑपरेटर प्रिया प्रकाश खंडारे, विद्युत सहाय्यक प्रियंका अशोक ठोंबरे, मुंबई पोलीस भरती झालेल्या प्रितेश रोहिदास राऊत, पोलीस पाटीलपदी नियुक्त संध्या वसंत भालेराव आणि कॉम्प्युटर इजि पदावर नियुक्त स्नेहा उजगरे यांचा गौरव करण्यात आला.
वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविलेल्या डॉ. प्राची नानाभाऊ हजारे, डॉ. पियुष उमेश बनसोडे, डॉ. प्राची भास्कर आठवले, डॉ. साक्षी सुभाष वीर यांनी एमबीबीएस पदवी संपादन केल्याबद्दल, प्रा. डॉ. प्रेरणा यांनी बीएएमएस, एमडी पदवी मिळवल्याबद्दल, डॉ. समीक्षा चंद्रकांत उजगरे यांनी बीडीएस पदवी प्राप्त केल्याबद्दल तसेच तनय अनिल वानखेडे यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी (IIST), तिरुवनंतपुरम येथून बी.टेक. पदवी संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
तसेच अपूर्व मोहन गवई यांनी बीई कॉम्प्युटर पदवी मिळवल्याबद्दल आणि कु. आनंदी नामदेव शिंगारे यांनी आयुर मंगलम मूकबधिर विद्यालय, बीड येथून विशेष प्राविण्यासह एसएससी परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
सर्व सत्कारमूर्तींना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार, पेन आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र भेट देण्यात आले. यावेळी प्रा. प्रदीप रोडे व पी.व्ही. बनसोडे यांनी सत्कारमूर्तींना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आत्मसात करून समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखावी, असे आवाहन मान्यवरांनी केले. मिळालेले यश हे केवळ वैयक्तिक प्रगतीपुरते मर्यादित न ठेवता समाजाच्या उन्नतीसाठी त्याचा उपयोग करावा, असा संदेशही यावेळी देण्यात आला. सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्तींनी मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाचे व बहुमोल सूचनांचे जीवनात पालन करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमास अॅड. राजेश वाघमारे, इंजि. राहुल सोनवणे, प्रशांत वासनिक, सुजाता वासनिक, अॅड. तेजस वडमारे, अॅड. राजेश शिंदे, पी.आय. कुमारत पारवे, संपादक नितीन मुजमुले, अॅड. भास्कर सोनवणे,प्रा. वसंतराव ओगले, बी.जी. दळवी, बी.डी. तांगडे यांच्यासह महामानव अभिनंदन ग्रुप, ‘वाचाल तर वाचाल’ फिरते मोफत वाचनालयाचे सदस्य, विविध मान्यवर तसेच सत्कारमूर्तींचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment