परळी ग्रामीण तलाठी सज्जा बदलण्याची मागणी; शेतकरी व नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष - भागवत गीत्ते
परळी ग्रामीण तलाठी सज्जा बदलण्याची मागणी; शेतकरी व नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष - भागवत गीत्ते
परळी वैजनाथ | प्रतिनिधी
परळी ग्रामीण तलाठी सज्जाचा तात्काळ बदल करण्यात यावा, अशी मागणी मलकापूर येथील भागवत रामकिशन गित्ते यांनी उपविभागीय अधिकारी, परळी वैजनाथ यांच्याकडे दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी लेखी अर्जाद्वारे केली आहे.
अर्जात नमूद केल्यानुसार, परळी ग्रामीण तलाठी सज्जाचा कार्यभार तलाठी प्रतीक्षा बसापुरे या मागील सुमारे दोन वर्षांपासून सांभाळत आहेत. मात्र, या कालावधीत शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांची कामे अपेक्षित पद्धतीने होत नसल्याचा आरोप अर्जदाराने केला आहे.
तलाठी सज्जाचा कारभार त्यांच्या हाताखालील व्यक्तींच्या माध्यमातून चालविला जात असल्याचा दावाही अर्जात करण्यात आला आहे. तसेच, परळी ग्रामीण परिसरातील रस्त्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये इतर व्यक्तींकडून पंचनामे तयार करून घेण्यात आले असून, काही नोंदी चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, तलाठी कार्यालयाशी संबंधित कामांसाठी त्यांच्या हाताखालील व्यक्तींकडून मनमानी पद्धतीने पैशांची मागणी केली जात असल्याचेही अर्जदाराने म्हटले आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या सर्व तक्रारींची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि परळी ग्रामीण तलाठी सज्जाचा तात्काळ बदल करावा, अशी मागणी भागवत रामकिशन गित्ते यांनी केली आहे.
Comments
Post a Comment