पोकळे वस्तीवरील जि.प. शाळा जीर्णावस्थेत; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पोकळे वस्तीवरील जि.प. शाळा जीर्णावस्थेत; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

छताचे खपले कोसळत असल्याने विद्यार्थी-शिक्षक जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन; स्ट्रक्चर ऑडिट करून पुनर्बांधणीसाठी निधी द्या :- डॉ. गणेश ढवळे 
आष्टी : (दि. २८) आष्टी तालुक्यातील पिंपळा केंद्रांतर्गत लोणी सय्यदमिर येथील पोकळे वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत जीर्णावस्थेत असून छताचे खपले कोसळून विद्यार्थ्यांच्या अंगावर पडत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.

या शाळेचे तातडीने 'स्ट्रक्चर ऑडिट' करून धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी करण्यात यावी तसेच नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी जिल्हा वार्षिक नियोजन निधीतून आवश्यक तरतूद करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य, डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रेहमान यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

 ‘स्कूल ठीक करो’ अभियानातील पाहणीवर प्रश्नचिन्ह

‘स्कूल ठीक करो’ अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळांच्या दुरावस्थेची पाहणी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणारे आष्टीचे गटशिक्षणाधिकारी आणि शाळांच्या पाहणीसाठी परवानगी घेण्याच्या सूचना देणारे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रेहमान आता या धोकादायक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काय पाऊल उचलणार? नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देणार का? असा सवाल डॉ. गणेश ढवळे यांनी उपस्थित केला आहे.

 १९९८ साली बांधलेली इमारत जीर्ण

लोणी सय्यदमिर येथील पोकळे वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असून एकूण २६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेची इमारत सन १९९८ मध्ये षटकोनी आकारात बांधण्यात आली होती.मात्र, सध्या इमारतीची अवस्था अत्यंत खराब झाली असून छताचे खपले कोसळत आहेत.

शाळेच्या इमारतीच्या दुरवस्थेबाबत दरवर्षी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन पाठपुरावा करण्यात येत असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक दत्ता मामा शिंदे यांनी डॉ. गणेश ढवळे यांच्याशी बोलताना सांगितले.
 विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ नको

जीर्ण इमारतीत विद्यार्थ्यांना बसवून शिक्षण देणे धोकादायक ठरू शकते. एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होण्यापेक्षा तातडीने स्ट्रक्चर ऑडिट करून सुरक्षित वर्गखोल्या उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी