अजित पवार संशयास्पद मृत्यू प्रकरणात एफआयआर का नाही? अभिजीत दिपके यांच्यावर मात्र तत्काळ गुन्हा; डॉ. जितीन वंजारे यांचा सरकारवर निशाणा

अजित पवार संशयास्पद मृत्यू प्रकरणात एफआयआर का नाही? अभिजीत दिपके यांच्यावर मात्र तत्काळ गुन्हा; डॉ. जितीन वंजारे यांचा सरकारवर निशाणा
बीड | प्रतिनिधी

महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था, भ्रष्टाचार आणि शासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरून सामाजिक कार्यकर्ते डॉ. जितीन वंजारे यांनी राज्य सरकार आणि गृह विभागावर जोरदार टीका केली आहे. शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांविरोधात काम करणारे अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

“महाराष्ट्राला गृहमंत्री आहे का?” असा सवाल उपस्थित करत डॉ. वंजारे यांनी राज्यातील खून, लूटमार, चोरी, अवैध धंदे, वाळू तस्करी, भ्रष्टाचार, निकृष्ट रस्ते, पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांवर कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप केला.

दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टर अपघातातील मृत्यूबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणात संशय व्यक्त केला जात असताना एफआयआरबाबत तत्परता दिसत नाही; मात्र शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरप्रकार उघड करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अभिजीत दिपके यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला, असा आरोप डॉ. वंजारे यांनी केला.

स्कूल ठीक करो’ अभियानाचा संदर्भ

अभिजीत दिपके हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी ‘स्कूल ठीक करो’ अभियानाच्या माध्यमातून काम करत असल्याचा दावा डॉ. वंजारे यांनी केला. शाळांमध्ये स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, स्वयंपाकगृह, ग्रंथालय, मध्यान्ह भोजन तसेच इतर मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत की नाहीत, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

एका शाळेला भेट दिल्यानंतर तेथे इतर शाळांमधील विद्यार्थी आणून शाळेबाबत सकारात्मक प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी केला. विद्यार्थ्यांनी आपण या शाळेतील नसल्याचे सांगितल्यानंतर संबंधित प्रकार उघडकीस आल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर अभिजीत दिपके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे डॉ. वंजारे यांनी म्हटले.

“जर पोलीस प्रशासन एवढेच तत्पर असेल, तर शिक्षण विभागातील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी, निकृष्ट दर्जाची कामे, वाळू तस्करी आणि विविध खात्यांतील भ्रष्टाचाराच्या तक्रारींवरही तितक्याच तत्परतेने गुन्हे दाखल करावेत,” अशी मागणी त्यांनी केली.

ही लोकशाही की हुकूमशाही?’

शाळांमधील समस्या समोर आणण्यासाठी व्हिडिओ चित्रीकरण किंवा पाहणी करणाऱ्या सामाजिक व विद्यार्थी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात असतील, तर ही बाब लोकशाहीच्या दृष्टीने गंभीर असल्याचे डॉ. वंजारे यांनी म्हटले.

राज्यात जातीय व धार्मिक तेढ, गुन्हेगारी, गोळीबार, पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची गरज असताना सामाजिक व विद्यार्थी कार्यकर्त्यांवर कारवाई होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

गुन्हे मागे घेण्याची मागणी

“अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. अन्यथा महाराष्ट्रभर विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे मोठे आंदोलन उभे राहील,” असा इशारा डॉ. जितीन वंजारे यांनी दिला.

तसेच कॉक्रोच जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना आवश्यक पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी केली.

दरम्यान, राजस्थानमधील आशुतोष रांका यांच्यावरील कथित हल्ल्याचाही संदर्भ देत सामाजिक व विद्यार्थी कार्यकर्त्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे डॉ. वंजारे यांनी म्हटले.

“सरकारी यंत्रणेने दडपशाहीऐवजी पारदर्शकपणे काम करावे आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे. अभिजीत दिपके यांच्यावरील गुन्हे मागे न घेतल्यास महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा डॉ. जितीन वंजारे यांनी दिला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी