श्रीक्षेत्र नारायणगडच्या प्रमुख रस्त्याची चाळण; भाविकांची कसरत, लोकप्रतिनिधी-प्रशासनाचे दुर्लक्ष
श्रीक्षेत्र नारायणगडच्या प्रमुख रस्त्याची चाळण; भाविकांची कसरत, लोकप्रतिनिधी-प्रशासनाचे दुर्लक्ष
धाकटी पंढरी’कडे जाणाऱ्या नवगण राजुरी–नारायणगड रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा :- डॉ. गणेश ढवळे
बीड : (दि.२२)– बीड जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि ‘धाकटी पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र नारायणगड देवस्थानाकडे जाणाऱ्या नवगण राजुरी ते नारायणगड प्रमुख रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने भाविक, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने याच ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची मोठी उपस्थिती असते; मात्र देवस्थानाकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, लिंबागणेशकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
श्रीक्षेत्र नारायणगड हे बीड जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असून वर्षभर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांना जिल्हाभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे नवगण राजुरी ते नारायणगड हा प्रमुख रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र रस्त्याची दुरवस्था झाल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका देखील निर्माण झाला आहे.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देताना रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष का?
दि. ६ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘झाडे लावा, झाडे जगवा’ आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आवाहन करण्यात आले.प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असा प्रेरणादायी संदेशही देण्यात आला. मात्र त्याच जिल्ह्यातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्याची झालेली दुरवस्था प्रशासनाच्या निदर्शनास का येत नाही, असा सवाल डॉ. गणेश ढवळे यांनी उपस्थित केला आहे.
नारायणगड देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याची तातडीने पाहणी करून खड्डे बुजविण्यासह आवश्यक ती डांबरीकरणाची कामे करण्यात यावीत.भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
तीन प्रमुख मागण्या
नवगण राजुरी–नारायणगड रस्त्याची तातडीने पाहणी करून दुरुस्ती करावी.
रस्त्यावरील मोठे खड्डे तात्काळ बुजवून वाहतूक सुरळीत करावी.
श्रीक्षेत्र नारायणगडच्या धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा विचार करून रस्त्याच्या कायमस्वरूपी सुधारणेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा.
Comments
Post a Comment