वहालीत लाखोंची योजना, नळाला पाण्याचा थेंब नाही! जलजीवन मिशनच्या बोगस कामाच्या चौकशीसाठी शरद पवारांचे स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषण
पाटोदा (प्रतिनिधी) : आष्टी मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील वहाली गावात जलजीवन मिशन योजनेच्या कामावरून संताप व्यक्त होत आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करून नळयोजना राबविण्यात आली असतानाही गावातील नळाला पाण्याचा थेंब मिळत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे जलजीवन मिशनच्या कामाच्या गुणवत्तेवर आणि संपूर्ण योजनेच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनी शरद पवार यांनी ग्रामपंचायत वहालीसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. जलजीवन मिशनअंतर्गत झालेल्या कामांची सखोल व निष्पक्ष चौकशी करावी, बोगस व निकृष्ट कामाची जबाबदारी निश्चित करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
लाखो रुपये खर्च करूनही नळाला पाणी मिळत नसेल, तर या योजनेचा नेमका फायदा कोणाला झाला? असा सवाल उपस्थित होत आहे. मंजूर निधी, अंदाजपत्रक, प्रत्यक्ष झालेली कामे, वापरण्यात आलेले साहित्य आणि कामाची गुणवत्ता यांची तपासणी करून संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
भर पावसाळ्यातही गावकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेतून घराघरात पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात नळ कोरडे असल्याचा आरोप होत असल्याने संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही सवाल उपस्थित होत आहेत.
जलजीवन मिशनच्या कामाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि वहाली गावातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, या मागणीवर शरद पवार ठाम असून, मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
स्वातंत्र्यदिनी सुरू झालेल्या या आमरण उपोषणाची प्रशासन दखल घेते का आणि जलजीवन मिशनच्या कामाची चौकशी कधी सुरू होते, याकडे वहाली ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment