स्वातंत्र्य दिनी महामानवांच्या प्रतिमेला अभिवादन करताना अधिकाऱ्यांनी बूट न काढल्याचा आरोप; परळीत चौकशी व कारवाईची मागणी



परळी वैजनाथ : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त परळी वैजनाथ येथील उपजिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. मात्र, यावेळी प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पायातील बूट न काढताच महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन केल्याचा आरोप आंबेडकरवादी व गांधीवादी विचारांच्या नागरिकांनी केला आहे.

महामानवांच्या प्रतिमेस अभिवादन करताना शिष्टाचाराचे पालन न केल्याचा हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. विशेषतः भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर अभिवादन करताना योग्य तो आदर राखला जाणे अपेक्षित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला शासकीय कार्यालयात मोठे महत्त्व असताना प्रतिमांना अभिवादन करण्याच्या प्रसंगी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पायातील बूट काढले नसल्याच्या आरोपाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. या संपूर्ण प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून, दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी परळी शहरातील आंबेडकरवादी व गांधीवादी विचारांच्या नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकारामागे जातीय मानसिकता होती का, याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काही नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यास उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

तसेच, चौकशीअंती कायदेशीरदृष्ट्या अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी कायदा) गुन्हा दाखल करण्यास पात्र बाब आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

महामानवांचा सन्मान राखणे ही प्रशासनाची जबाबदारी

स्वातंत्र्य दिन हा देशाच्या लोकशाही मूल्यांचा आणि संविधानिक विचारांचा गौरव करण्याचा दिवस आहे. त्यामुळे अशा राष्ट्रीय कार्यक्रमात महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करताना सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आवश्यक शिष्टाचार व आदराचे पालन करणे गरजेचे आहे. या प्रकरणात प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे परळीकरांचे लक्ष लागले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी