सामान्य माणसाच्या कराच्या पैशातून मिळतंय तरी काय?; परळी शहरातील स्वच्छतेवरून राष्ट्रवादीचा नगरपालिकेला सवाल
सामान्य माणसाच्या कराच्या पैशातून मिळतंय तरी काय?; परळी शहरातील स्वच्छतेवरून राष्ट्रवादीचा नगरपालिकेला सवाल
श्रावण सुरू होण्यापूर्वी मुख्य रस्ते, फुटपाथ आणि कीटकनाशक फवारणीचा मुद्दा ऐरणीवर
परळी प्रतिनिधी :
श्रावण महिना सुरू होणार असून परळी वैजनाथ येथे बाहेरगावाहून मोठ्या संख्येने शिवभक्त महिला आणि भाविक दर्शनासाठी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर परळी शहरातील स्वच्छता आणि नागरी सुविधांच्या स्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
“सामान्य माणसाच्या कराच्या पैशातून आम्हाला मिळतंय तरी काय?” असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे परळी शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
परळी शहरातील मुख्य रस्त्यांची पाहणी केली असता अनेक ठिकाणी अस्वच्छता आणि कचऱ्याची समस्या दिसून येत असल्याचा आरोप करत, शहरातील एक तरी मुख्य रस्ता पूर्णपणे स्वच्छ आहे का? असा सवाल त्यांनी केला.
फक्त एखाद्या घरासमोरचा भाग किंवा एखादा चौक स्वच्छ करून संपूर्ण शहर स्वच्छ झाल्याचा दावा करता येणार नाही. संपूर्ण रस्ता स्वच्छ आणि कचरामुक्त असणे आवश्यक आहे, असे गंगणे पाटील यांनी म्हटले.
फुटपाथचीही दुरवस्था
शहरातील फुटपाथच्या अवस्थेवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी फुटपाथ कचऱ्याने भरलेले आहेत, काही ठिकाणी अतिक्रमणामुळे नागरिकांना चालण्यासाठी जागा उरलेली नाही, तर काही ठिकाणी फुटपाथच गायब झाल्याचे त्यांनी सांगितले.
“नागरिकांनी चालायचं तरी कुठून? फुटपाथ नागरिकांच्या सोयीसाठी आहेत की केवळ कागदावर दाखवण्यासाठी?” असा सवाल त्यांनी केला.
कीटकनाशक फवारणीबाबतही प्रश्न
श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी शहरात कीटकनाशकाची फवारणी करण्यात आली आहे की नाही, याबाबतही नगरपालिकेने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी महादेव गंगणे पाटील यांनी केली.
फवारणी केली असेल तर ती कधी, कुठे आणि किती भागात करण्यात आली? आणि केली नसेल तर का केली नाही? याचे उत्तर नगरपालिकेने नागरिकांसमोर ठेवावे, असे त्यांनी म्हटले.
“टेंडर आणि बिलांपलीकडेही नगरपालिका काम करते का?”
“नगरपालिकेची जबाबदारी रस्ते स्वच्छ ठेवणे, कचरा उचलणे, नाल्या-गटारी स्वच्छ करणे, कीटकनाशकाची फवारणी करणे, फुटपाथ व सार्वजनिक जागांची देखभाल करणे आणि नागरिकांना मूलभूत सुविधा देणे ही आहे. मग या सुविधा प्रत्यक्षात दिसत का नाहीत?” असा सवाल गंगणे पाटील यांनी केला.
“नगरपालिकेचं काम फक्त टेंडर काढणे, कामे कागदावर दाखवणे आणि बिलं काढणे एवढंच आहे का? सामान्य नागरिकांच्या करातून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग नेमका कुठे होतो, याचा जाब नागरिकांना मिळायला हवा,” असेही त्यांनी म्हटले.
श्रावण महिन्यात परळी वैजनाथच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येणार असताना शहरातील रस्ते, फुटपाथ आणि सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे. “भाविकांचे स्वागत अस्वच्छता आणि कचऱ्याने होऊ नये. नगरपालिकेने तातडीने शहरातील स्वच्छता आणि नागरी सुविधांकडे लक्ष द्यावे,” अशी मागणी महादेव गंगणे पाटील यांनी केली.
Comments
Post a Comment