दारावती तांडा महसुली गावाचा सातबारा स्वतंत्र करण्याची मागणी उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दिले निवेदन
दारावती तांडा महसुली गावाचा सातबारा स्वतंत्र करण्याची मागणी उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दिले निवेदन
दारावती तांड्याला महसुली दर्जा असणाऱ्या गावाला स्वतंत्र सातबारा मिळालाच पाहिजे; प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा–प्रवीण पवार
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :
मौजे दारावती तांडा या महसुली गावाचा स्वतंत्र सातबारा करून गावाचा परळी ग्रामीण सज्जामध्ये समावेश करावा, अशी मागणी ग्रुप ग्रामपंचायत लमान दारावती तांडा येथील ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पवार यांनी आज दि. ०७ ऑगस्ट रोजी उपजिल्हाधिकारी व तहसीलदार, परळी वैजनाथ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दारावती तांड्याला महसुली गावाचा दर्जा मिळून अनेक वर्षे झाली, मात्र आजही स्वतंत्र सातबारा नसल्यामुळे शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना व महसुली सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. दारावती तांड्याचा स्वतंत्र सातबारा तयार करावा. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावाअशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पवार यांनी केली आहे. दरम्यान उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर व तहसीलदार विनोद रनवरे यांनी निवेदन स्वीकारले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी बीड यांनी २२ जुलै १९९२ रोजीच्या अधिसूचनेद्वारे वसंतनगर, मलकापूर आणि दारावती तांडा या गावांना महसुली गावाचा दर्जा दिला होता. तसेच तहसील कार्यालयानेही दारावती तांड्यास महसुली गावाचा दर्जा असल्याचे नमूद केले आहे. मात्र, वसंतनगर, वैजवाडी आणि मलकापूर या गावांचे सातबारा स्वतंत्र करण्यात आले असताना दारावती तांड्याचा सातबारा अद्यापही स्वतंत्र करण्यात आलेला नाही. दारावती तांडा महसुली गावासाठी निश्चित करण्यात आलेले सर्वे क्रमांक आजही परळी वैजनाथ गावाच्या नोंदीत असल्यामुळे येथील शेतकऱ्यांना विविध ग्रामीण शासकीय योजनांचा लाभ घेण्यास अडचणी निर्माण होत असून अनेक प्रशासकीय अडथळ्यांना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या अधिसूचनेनुसार दारावती तांडा गावाचा स्वतंत्र सातबारा तयार करून परळी ग्रामीण सज्जामध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पवार यांनी उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे केली आहे.
मौजे दारावती तांड्याला महसुली गावाचा दर्जा मिळूनही आजपर्यंत स्वतंत्र सातबारा करण्यात आलेला नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना, कर्ज, अनुदान तसेच इतर महसुली कामांमध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्हाधिकारी यांच्या अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी करून दारावती तांड्याचा स्वतंत्र सातबारा तयार करावा आणि गावाचा परळी ग्रामीण सज्जामध्ये समावेश करावा. प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, ही आमची अपेक्षा आहे. तसेच दारावती तांड्याच्या प्रत्येक नागरिकाचा आणि शेतकऱ्याचा प्रश्न हा माझा स्वतःचा प्रश्न आहे. गावाच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रत्येक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहणार आहे. दारावती तांड्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करत राहीन अशी प्रतिक्रिया प्रविण पवार यांनी दिली आहे. यावेळी विशाल चव्हाण, कदम चव्हाण आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment