15 ऑगस्ट व 26 जानेवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन अनिवार्य करा-नितीन सोनवणे

15 ऑगस्ट व 26 जानेवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन अनिवार्य करा-नितीन सोनवणे 

शासकीय शिष्टाचारात स्वतंत्र जीआर जारी करण्याची ऑल इंडिया पँथर सेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बीड : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमांमध्ये अधिकृत शासकीय शिष्टाचाराचा भाग म्हणून अनिवार्य करण्यात यावे, अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.

ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी जिल्हाधिकारी, बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री कार्यालयाकडे याबाबत निवेदन सादर केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असून, संविधानाने देशाला लोकशाही, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुतेची मूल्ये दिली आहेत. त्यामुळे संविधान निर्मितीतील बाबासाहेबांचे योगदान अमूल्य आहे. अनेक शाळा, महाविद्यालये, संस्था तसेच काही शासकीय कार्यालयांमध्ये 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन स्वयंस्फूर्तीने केले जाते. मात्र, याबाबत संपूर्ण राज्यात एकसमान शासकीय प्रोटोकॉल नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील काही शासकीय शाळा व महाविद्यालयांमध्ये 15 ऑगस्ट रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलेले दिसून आले नाही, असा दावा करत ही बाब शासकीय शिष्टाचारात अधिकृतपणे समाविष्ट करण्याची आवश्यकता असल्याचे सोनवणे यांनी म्हटले आहे.

त्यामुळे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यक्रमांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्याबाबत स्वतंत्र व स्पष्ट शासन निर्णय (जीआर) जारी करावा, तसेच त्याची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ही मागणी संविधानिक मूल्यांशी सुसंगत असून जनतेच्या भावनांचे प्रतिबिंब आहे. शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नितीन सोनवणे यांनी व्यक्त केली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी