शहीद काँम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तक प्रकरणी आ. संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन
शहीद काँम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तक प्रकरणी आ. संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन; बागेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचाही निषेध : डॉ. गणेश ढवळे
लिंबागणेश (दि.२५) : शहीद काँम्रेड गोविंद पानसरे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप तसेच पुस्तक वितरक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ लिंबागणेश येथे ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. याचवेळी बागेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या संदर्भात केलेल्या कथित तथ्यहीन वक्तव्याचाही तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.
गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या शीर्षकावरून पुस्तक न वाचताच आक्षेपार्ह उद्गार काढल्याचा आरोप बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर येथील पुस्तक वितरक प्रशांत आंबी यांना व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला.
या प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा व अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज लढून थकले होते व त्यांनी राज्यकारभार रामदास स्वामींकडे सोपविला, असे कथित वक्तव्य केल्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. या वक्तव्याचाही तीव्र निषेध करण्यात आला.
शनिवार (दि.२५ एप्रिल) रोजी सकाळी लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलनकर्त्यांनी आ. संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला. या वेळी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक, बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविण्यात आले.
या आंदोलनात सरपंच बालासाहेब जाधव, सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ, विक्रांत वाणी, बाळकृष्ण थोरात, श्रीहरी निर्मळ, भगवान मोरे, रामचंद्र मुळे, सुरेश निर्मळ, सुरज कदम, संतोष भोसले, दादा गायकवाड, दिपक थोरात, गुलाब कांबळे, पप्पू निर्मळ, रावसाहेब निर्मळ, भालचंद्र कुदळे आदी शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Comments
Post a Comment