शिवद्रोहींवर कारवाईची मागणी; “शिवरायांची बदनामी सरकार प्रायोजित आहे का?”जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
शिवद्रोहींवर कारवाईची मागणी; “शिवरायांची बदनामी सरकार प्रायोजित आहे का?”जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन:- डॉ. गणेश ढवळे
बीड (दि.२७): छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तथ्यहीन व ऐतिहासिक आधार नसलेली विधाने करून अवमानना करणाऱ्या बागेश्वरधामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी शिवप्रेमी डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेश) यांच्या नेतृत्वाखाली आज (दि.२७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले.
फडणवीस सरकारच्या कार्यकाळात बहुजन महापुरुषांची अवमानना करणाऱ्या वाचाळवीरांच्या संख्येत वाढ झाल्याचा आरोप करत, सरकारकडून ठोस कारवाई होत नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत संबंधित वक्तव्य झाले असल्याने, “ही अवमानना सरकार प्रायोजित आहे का?” असा सवाल शिवप्रेमींनी उपस्थित केला.
संबंधित प्रकरणात कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत राष्ट्रपती व राज्यपाल यांना पाठविण्यात आले.
नागपूर येथे “भारतदुर्गा” मंदिराच्या शिलान्यास कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. संबंधित वक्तव्य ऐतिहासिक सत्याचा विपर्यास करणारे असून शिवरायांचा अवमान करणारे आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
या आंदोलनात शेख युनुस, रामनाथ खोड, गणेश मस्के,माजी सैनिक अशोक येडे, सय्यद सादेक,रामधन जमाले,शेख मुबीन,बाजीराव ढाकणे, डॉ.संजय तांदळे, प्रा.डी.जी.तांदळे, डॉ. लक्ष्मण पवळ ,प्रविण पालीमकर,अशोक ढोले,शिवाजी हिंदोळे
आदी सहभागी झाले होते.
दरम्यान, “छत्रपती शिवाजी महाराजांची वारंवार बदनामी होत असताना शासन निष्क्रिय का?” असा सवाल उपस्थित करत “ही बदनामी सरकार प्रायोजित आहे का?” असा थेट प्रश्न डॉ. ढवळे यांनी उपस्थित केला आणि सरकारचा निषेध नोंदविला.
Comments
Post a Comment