बीड शहरासाठी शववाहिका दुरुस्त करून लवकरच सेवेत-शेख निजाम
बीड, प्रतिनिधी — बीड शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. बीड नगरपालिका प्रशासन व स्वच्छता व आरोग्य सभापती निजाम शेख यांच्या सूचनेवरून शहरातील बंद पडलेली शववाहिका दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच ती नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शहरात आपत्कालीन परिस्थितीत किंवा दुःखद प्रसंगी शववाहिकेची अत्यंत गरज भासते. मात्र, मागील काही काळापासून तांत्रिक बिघाडामुळे ही सेवा खंडित झाली होती. त्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता, ज्यामुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता.
ही बाब लक्षात घेऊन स्वच्छता व आरोग्य सभापती निजाम शेख यांनी तात्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना शववाहिका त्वरित दुरुस्त करून सेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्या. नगरपालिका प्रशासनानेही या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.
तसेच, बीड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री सुनेत्राताई पवार आमदार विजय सिंह पंडित, यांच्या मार्गदर्शनात नगराध्यक्ष प्रेमलताताई पारवे, उपाध्यक्ष विनोद मुळूक, तसेच नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब भाई हे सर्व लोकप्रतिनिधी कटिबद्ध असून, नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.
यावेळी नगरसेवक शेख माज्जेद, स्वच्छता निरीक्षक भागवत जाधव साहेब, तसेच कर्मचारी पप्पू साळवे व जावेद खान आदी सर्व कर्मचारी उपस्थित होते.
लवकरच ही शववाहिका अत्याधुनिक सुविधांसह सज्ज होऊन बीड शहरातील नागरिकांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या निर्णयामुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, गरजूंना मोठा दिलासा मिळणार आहे.
“नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध”
निजाम शेख यांनी सांगितले की, “बीड शहरातील नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी नगरपालिका प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. शववाहिका सेवा लवकरात लवकर सुरू करून नागरिकांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
शहराच्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.
Comments
Post a Comment