बौद्ध संस्कार विधींमध्ये सम्राट अशोकांची प्रतिमा लावण्याचे आवाहन
बीड (प्रतिनिधी) : बौद्ध धर्मीयांच्या संस्कार विधींमध्ये तथागत भगवान बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसोबतच चक्रवर्ती सम्राट अशोक यांची प्रतिमा किंवा मूर्ती अनिवार्यपणे ठेवावी, असे आवाहन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा)च्या संस्कार विभागामार्फत करण्यात आले आहे.
संस्थेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी यासंदर्भात मार्गदर्शन करताना सांगितले की, बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनामध्ये सम्राट अशोक यांचे अतुलनीय योगदान आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे बुद्ध धम्म भारतात व्यापक प्रमाणात प्रसारित झाला. त्याच परंपरेला पुढे नेत, १४ ऑक्टोबर १९५६ रोजी विजयादशमीच्या दिवशी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माचा स्वीकार करून या देशाला पुन्हा बुद्धधर्माची दिशा दिली.
या ऐतिहासिक योगदानाच्या पार्श्वभूमीवर, प्रत्येक बौद्ध संस्कार विधीत तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतच चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे स्थान अधोरेखित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे विवाह, नामकरण, गृहप्रवेश यांसारख्या सर्व धार्मिक विधींमध्ये सम्राट अशोक यांची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवूनच विधी पार पाडावेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
बौद्ध समाजाने सम्राट अशोकांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा सन्मान राखावा आणि पुढील सर्व संस्कार विधी या नव्या पद्धतीने पार पाडावेत, अशी अपेक्षा देखील डॉ. भीमराव आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment