SIR गणना फॉर्म भरण्यासाठी वार्ड क्र. १९, २०, २१ व २२ मध्ये विशेष कॅम्प; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – सभापती शेख निजाम यांचे आवाहन
बीड शहरातील वार्ड क्रमांक १९, २०, २१ व २२ मधील नागरिकांना SIR (Special Intensive Revision) गणना फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुलभ व वेगवान व्हावी, तसेच एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाऊ नये, या उद्देशाने जयहिंद कॅम्पस, मिलतनगर, बीड येथे शनिवार दि. ११ जुलै ते रविवार दि. १२ जुलै २०२६ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पमध्ये नागरिकांना BLO च्या माध्यमातून SIR गणना फॉर्म भरून घेण्याची, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून घेण्याची तसेच मतदार यादीसंदर्भातील विविध शंकांचे निरसन करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या जनहिताच्या उपक्रमासाठी आमदार विजयसिंहराजे पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, नगराध्यक्ष प्रेमलताताई पारवे, मुख्याधिकारी श्री. मांडुरके साहेब तसेच वार्ड क्रमांक १९, २०, २१ व २२ चे सर्व लोकप्रतिनिधी व नगरसेवक मार्गदर्शन व सहकार्य करीत असून, नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
याबाबत माहिती देताना स्वच्छता व आरोग्य सभापती तथा नगरसेवक शेख निजाम जैनुद्दीन यांनी सांगितले की, लोकशाही व्यवस्थेचा पाया मजबूत करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने ही जबाबदारी ओळखून वेळ न घालवता या विशेष कॅम्पचा लाभ घ्यावा. मतदार ओळखपत्र, आधार कार्ड व पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत आणून आपला SIR गणना फॉर्म भरावा. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत BLO व कॅम्पमधील कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया पूर्ण करावी.
या उपक्रमामुळे वार्डातील हजारो नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होणार असून, फॉर्म भरण्यासाठी होणारी धावपळ व वेळेचा अपव्यय टळणार आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात येणाऱ्या या विशेष कॅम्पला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन स्वच्छता व आरोग्य सभापती शेख निजाम जैनुद्दीन, नगरसेवक सय्यद सादिक अली, बाळासाहेब गुंजाळ शेख खय्युम इनामदार, सय्यद इलियास, मनोज गोडसे, दत्ता जाधव, शेख रईस सर, यांनी केले आहे. तसेच प्रत्येक नागरिकाने आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि शेजाऱ्यांनाही या कॅम्पची माहिती देऊन त्यांनाही सहभागी करून घ्यावे, असेही त्यांनी नमूद केले. नागरिकांच्या सक्रिय सहभागातून हा उपक्रम यशस्वी होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
Comments
Post a Comment