पाटोद्यात संत एकनाथ महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत

पाटोद्यात संत एकनाथ महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत

सय्यद आबुशेठ मित्र मंडळाकडून वारकरी भाविकांना फळे व पिण्याच्या पाण्याचे वाटप; सेवाभावी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
पाटोदा (प्रतिनिधी) पैठण ते पंढरपूर असा प्रवास करणाऱ्या संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे आज पाटोदा शहरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोषात स्वागत करण्यात आले. शहरात पालखीचे आगमन होताच टाळ- मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा अखंड जयघोष आणि "ज्ञानोबा-तुकाराम"च्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. पालखीचे दर्शन घेण्यासाठी शहरातील नागरिक, वारकरी, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी शहरातील विविध सामाजिक संस्था, मंडळे आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वारकरी संप्रदायाच्या परंपरेला साजेशा वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले. अनेक भाविकांनी संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केला.यावेळी सय्यद आबुशेठ मित्र मंडळाच्या वतीने पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी भाविकांना फळे व पिण्याच्या पाण्याचे मोफत वाटप करण्यात आले. शेकडो वारकरी भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला. सेवाभावातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे वारकरी भाविकांसह उपस्थित नागरिकांनीही मनापासून कौतुक केले.वारकरी भाविकांच्या सोयीसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने सेवा बजावत फळे व पिण्याचे पाणी वाटप केले. वारकरी संप्रदायाची सेवा हीच ईश्वरसेवा मानून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.पालखी सोहळ्याच्या आगमनामुळे पाटोदा शहरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. विठ्ठल नामाचा गजर, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि वारकऱ्यांच्या उत्साहामुळे शहर भक्तीमय झाले. नागरिकांनी पालखीचे दर्शन घेत संत एकनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना केली आणि वारकरी परंपरेबद्दलचा आपला आदर व्यक्त केला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी