एसटीच्या बीड विभागात ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक
एसटीच्या बीड विभागात ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक
आत्मसन्मानासाठी संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल
श्रीरंग बरगे यांचा बीड जिल्ह्यातील एसटीच्या व्यवस्थापनाला इशारा
बीड (दिनांक १४ जुलै) एसटीच्या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना सन्मान देणाऱ्या जेष्ठ चालक, वाहकांना स्वतःला मात्र कामगिरी करताना तुम्ही बाहेरून बदली करून आलात, ज्येष्ठता सूचित खाली आहात, ही कामगिरी मिळणार नाही, ती कामगिरी मिळणार नाही असं वारंवार हिणवलं जात असेल तर हे दुर्दैवी असून आत्मसन्मानासाठी संघर्ष करावा लागेल असा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी बीड जिल्ह्यातील एसटीच्या व्यवस्थापनाला दिला आहे.
ते आज छत्रपती शिवाजी महाराज चौक,बीड येथील एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर झालेल्या महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस या संघटनेच्या नाम फलक अनावरण प्रसंगी बोलत होते. या वेळी मोठ्या संख्येने इतर संघटना मधील अनेक कामगारांनी संघटनेत प्रवेश केला.
बरगे पुढे म्हणाले की, बीड जिल्ह्यातील तरुण नोकरीच्या निमित्ताने गाव, परिवार व संसार सोडून राज्यातील इतर कुठल्याही जिल्ह्यात जाऊन काम करण्याचे धाडस व हिंमत दाखवतात.१०, २० वर्षे नोकरी केल्यावर त्यांना आपल्या जिल्ह्यात बदली मिळते, नोकरीतील शेवटची काही वर्षे परिवारासोबत आनंदात घालवण्याची संधी त्यांना मिळाली असतानाच, मूळ जिल्ह्यात आल्यावर पर्यवेक्षक व अधिकाऱ्यांकडून कामगिरी देताना मात्र तुम्ही बाहेरून बदली करून आलात, ज्येष्ठता सूचित खाली आहात, ही कामगिरी मिळणार नाही, ती कामगिरी मिळणार नाही,असे म्हणत सारखं हिणवलं जाते व मानसिक त्रास दिला जातो.हे योग्य नसून याला बीड विभागातील वरिष्ठ अधिकारी जबाबदार असून बीड विभागात महामंडळाच्या परिपत्रकाचा गैर अर्थ लाऊन बाहेरून बदली होऊन आलेल्या कर्मचाऱ्यावर वारंवार अन्याय केला जात आहे. धाराशिव व सातारा विभागात बाहेरून बदली होऊन आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या परिपत्रकाचा एक अर्थ लावला जातो,व बिड विभागात मात्र दुसरा अर्थ लावला जातो,हे अन्यायकारक असून बाहेरच्या जिल्ह्यातून बदली होऊन आलेल्या कर्मचाऱ्यांना वेगळं काहीच नको, वेगळे भत्ते नकोत, वेगळा पगार नको. जे परिपत्रकात नमूद केलंय तेच द्या. एवढीच माफक अपेक्षा असून या कर्मचाऱ्यांच्या आत्मसन्मानासाठी प्रसंगी आंदोलन करावे लागले तरी मागे हटणार नाही, असेही बरगे यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले आहे. या वेळी, राजेंद्र वाहटूळे, विशाल कांबळे, विजय जगताप, अभिजित सूर्यवंशी,अशोक महानोर, शेषराव नागरगोजे, ईश्वर माळवाले, भगवान गर्जे, श्रीकृष येवले, विकास गीते, बाळकृष्ण पेंटुळे, गजानन गिराम, राजकुमार आंधळे आदी पदाधिकाऱ्यांसह कर्मचारी मोठी संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment