नामकरणाच्या श्रेयवादात संत मुक्ताईंच्या आजोबा गोविंदपंत यांच्या समाधीची दुर्दशा विसरले का?

नामकरणाच्या श्रेयवादात संत मुक्ताईंच्या आजोबा गोविंदपंत यांच्या समाधीची दुर्दशा विसरले का?


समाधीचा जीर्णोद्धार रखडला; कोनशिला गळून पडली, संरक्षक भिंतीला तडे – पालकमंत्री सुनेत्रा पवार, आ.विजयसिंह पंडित यांनी लक्ष घालावे : डॉ. गणेश ढवळे
बीड, दि. (१४ ):बीड शहरातील सुभाष रोडचे 'संत मुक्ताई मार्ग' असे नामकरण करण्यासाठी पुढाकार घेणारे लोकप्रतिनिधी, नगरपरिषदेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांनी संत मुक्ताईंचे आजोबा गोविंदपंत यांच्या समाधीस्थळाच्या दुरवस्थेकडे मात्र दुर्लक्ष केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केला आहे. समाधीस्थळावरील रखडलेली विकासकामे तातडीने पूर्ण करून परिसराचा जीर्णोद्धार करावा, अशी मागणी त्यांनी पालकमंत्री सुनेत्रा पवार, आमदार विजयसिंह पंडित, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी बीड आणि मुख्याधिकारी, नगरपरिषद बीड यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

डॉ. ढवळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, दोन दिवसांपूर्वी सुभाष रोडचे 'संत मुक्ताई मार्ग' असे नामकरण करण्यात आले. मात्र बिंदुसरा नदीकाठी जैन भवन परिसरातील संत मुक्ताईंचे आजोबा गोविंदपंत यांच्या समाधीस्थळाची गेल्या पाच वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. समाधीच्या जीर्णोद्धारासाठी उभारण्यात आलेली 'कोनशिला' गळून पडली असून संरक्षक भिंतीला मोठे तडे गेले आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक व धार्मिक स्थळाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

याशिवाय नगरपरिषदेकडून सुमारे आठ वर्षांपूर्वी स्वच्छतागृह, सभागृह, भक्तनिवास आदी सुविधांच्या उभारणीसाठी काम सुरू करण्यात आले होते. काही पिलर उभारल्यानंतर कंत्राटदाराने काम अर्धवट सोडल्याने आजही भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. पुजाऱ्यांसाठी निवासव्यवस्था, भक्तनिवास, पिण्याच्या पाण्याची सुविधा नसून परिसरात फरशी किंवा पेव्हर ब्लॉकही टाकण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात चिखल होत असून भाविकांची मोठी गैरसोय होत आहे.


मुख्य मागण्या

गोविंदपंत यांच्या समाधीस्थळाचा तातडीने जीर्णोद्धार करावा.

संरक्षक भिंतीची दुरुस्ती करून सुरक्षितता सुनिश्चित करावी.

रखडलेले स्वच्छतागृह, सभागृह व भक्तनिवासाचे बांधकाम पूर्ण करावे.

पिण्याच्या पाण्याची सुविधा, फरशी/पेव्हर ब्लॉक व मूलभूत सोयी उपलब्ध करून द्याव्यात.




डॉ. गणेश ढवळे यांचा सवाल "संत मुक्ताई मार्ग' नामकरणाच्या श्रेयवादासाठी पुढाकार घेणाऱ्या लोकप्रतिनिधींना संत मुक्ताईंचे आजोबा गोविंदपंत यांच्या समाधीस्थळाची झालेली दुरवस्था दिसली नाही का? केवळ नामकरण न करता संत परंपरेशी संबंधित स्थळांचे जतन व विकास करणेही तितकेच महत्त्वाचे आहे." – डॉ. गणेश ढवळे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी