पाटोद्यातील पाच व सात कोटींच्या रस्त्यांची थोड्याशा पावसातच लागली वाट

पाटोद्यातील पाच व सात कोटींच्या रस्त्यांची थोड्याशा पावसातच लागली वाट

पाटोदा ते शंभरचिरा व पाटोदा ते साकत मार्गावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे; प्रवासी हैराण

पाटोदा | प्रतिनिधी : पाटोदा तालुक्यात कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले पाटोदा–शंभरचिरा व पाटोदा–साकत हे रस्ते थोड्याशा पावसातच उखडल्याचे चित्र समोर आले आहे. पाच व सात कोटी रुपयांच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या या रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.अवघ्या वर्षभरातच रस्त्यांची दुरवस्था झाल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने खड्डे दिसून येत नाहीत आणि प्रवास अधिक धोकादायक ठरत आहे.या दोन्ही मार्गांवरून दररोज शेकडो नागरिकांची ये-जा होत असते. मात्र रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहता प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवताना वाहनांची मोठी कसरत होत असून किरकोळ अपघातही घडत असल्याचे नागरिक सांगत आहेत.स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजवावेत व आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्यांची झालेली ही अवस्था विकासकामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी