७० वर्षांची जीर्ण शाळा विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतणार? गणगेवाडी जिल्हा परिषद शाळेचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन इमारत उभारण्याची मागणी

७० वर्षांची जीर्ण शाळा विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतणार? गणगेवाडी जिल्हा परिषद शाळेचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन इमारत उभारण्याची मागणी

१९५६ मध्ये स्थापन झालेल्या शाळेच्या भिंतींना तडे, पावसाळ्यात वर्गखोल्या गळक्या; डॉ. गणेश ढवळे यांचे शासनाकडे निवेदन
बीड:-( दि.३) :आष्टी तालुक्यातील केंद्र बेलगाव अंतर्गत गणगेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत अत्यंत जीर्णावस्थेत पोहोचली असून विद्यार्थी आणि शिक्षक अक्षरशः जीव मुठीत धरून शिक्षण व अध्यापन करत आहेत. सुमारे ७० वर्षांपूर्वी उभारलेल्या या इमारतीच्या भिंतींना मोठमोठे तडे गेले असून पावसाळ्यात वर्गखोल्या गळत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शाळेचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या निधीतून तरतूद करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य)चे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार, शिक्षणमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.

गणगेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्थापना १९५६ साली झाली. सध्या या शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे ११० विद्यार्थी शिक्षण घेत असून ६ शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, इमारत मोडकळीस आल्याने कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने नवीन इमारतीचा प्रस्ताव मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

शाळा सुरू झाल्यापासून अनेक पिढ्यांनी याच इमारतीत शिक्षण घेतले आहे. मात्र, आज हीच इमारत विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण करणारी ठरत असून शासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे डॉ. ढवळे यांनी म्हटले आहे.
दरवर्षी वरिष्ठांना अहवाल; तरीही निर्णय प्रलंबित

गणगेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ भोरे यांनी सांगितले की, शाळेची इमारत सुमारे ७० वर्षे जुनी असून भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. शाळेच्या जीर्ण अवस्थेबाबत दरवर्षी वरिष्ठ कार्यालयाला अहवाल सादर करण्यात येतो. मात्र, अद्याप नवीन इमारत किंवा दुरुस्तीबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची चिंता वाढली आहे.


आ. सुरेश आण्णा धस यांनी तातडीने लक्ष घालावे – डॉ. गणेश ढवळे

आष्टी तालुक्यातील गणगेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अवस्था अत्यंत धोकादायक झाली असून विद्यार्थ्यांचे भविष्य आणि सुरक्षितता दोन्ही धोक्यात आले आहेत. त्यामुळे नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सुरेश आण्णा धस यांनी तातडीने लक्ष घालून शासनस्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी