कै. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या संमतीपत्रासाठी कथित ₹५०० वसुलीची चौकशी करा
कै. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या संमतीपत्रासाठी कथित ₹५०० वसुलीची चौकशी करा
खाजगी बँक खात्यावर पैसे जमा करण्यास सांगितल्याचा दावा; आर्थिक फसवणुकीचा संशय, दोषींवर कारवाईची माजी सैनिक अशोक येडे ,आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष यांची मागणी
बीड, दि. ८ :कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांकडून "संमतीपत्र (कन्सेंट लेटर) सुरू करण्याच्या" नावाखाली प्रत्येकी ₹५०० रक्कम एका खाजगी बँक खात्यावर जमा करण्यास सांगितले जात असल्याचा दावा समोर आला असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी सैनिक तथा आम आदमी पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रक्कम शांतीकुमार आगलावे यांच्या नावावरील खाजगी बँक खात्यात जमा करण्यास सांगितले जात असल्याचा दावा आहे. लाभार्थ्यांना पाठविण्यात आलेल्या संदेशात, "आज पैसे जमा केले नाहीत तर तुमचे संमतीपत्र सुरू होणार नाही. त्याची जबाबदारी ग्राहकाची राहील. ज्यांनी पैसे जमा केले आहेत त्यांच्याच कामाची प्रक्रिया करण्यात येईल," असा मजकूर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अधिकृत शासकीय शुल्क असल्यास ते शासनाच्या अधिकृत खात्यात किंवा शासनाने निश्चित केलेल्या अधिकृत प्रक्रियेद्वारेच स्वीकारले जाणे अपेक्षित आहे. मात्र, खाजगी व्यक्तीच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यास सांगितले जात असल्याचा दावा अत्यंत गंभीर असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी येडे यांनी केली आहे.
याप्रकरणी जिल्हा प्रशासन, कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तसेच आर्थिक गुन्हे शाखेने तातडीने चौकशी करून कोणत्याही प्रकारची आर्थिक फसवणूक झाली असल्यास संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
कारवाई न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा
या प्रकरणात तातडीने योग्य ती कारवाई न झाल्यास आम आदमी पार्टी, बीड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी दिला आहे.
लाभार्थ्यांना सावध राहण्याचे आवाहन
कोणतीही रक्कम जमा करण्यापूर्वी संबंधित कार्यालयाकडून अधिकृत लेखी आदेश, शुल्काबाबतची माहिती आणि शासनाने निश्चित केलेली अधिकृत प्रक्रिया यांची खात्री करूनच आर्थिक व्यवहार करावेत. कोणत्याही अनधिकृत किंवा संशयास्पद खात्यावर पैसे जमा करण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही अशोक येडे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment