किस्किंदा पांचाळ यांना ‘समाजरत्न नारीशक्ती विशेष पुरस्कार २०२६’; ११ वर्षांच्या सामाजिक कार्याची पावती



बीड प्रतिनिधी : (दि.०१) शिर्डी येथे विश्वकर्मा वंशीय समाज संघटना, अहिल्यानगर परिवाराच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सन्मान व समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात सामाजिक कार्यकर्त्या किस्किंदा पांचाळ यांना ‘समाजरत्न नारीशक्ती विशेष सन्मान पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले.

शुभारंभ लॉन्स, निघोज-कोपरगाव हायवे, शिर्डी येथे झालेल्या या कार्यक्रमात सौ. रेखा राऊत व सौ. अश्विनी गडकर यांच्या हस्ते किस्किंदा पांचाळ यांना फेटा, ट्रॉफी, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

गेल्या ११ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या किस्किंदा पांचाळ यांनी समाजातील गरजू, वंचित घटकांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. कोरोना काळात संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना त्यांनी स्वतःचे दागिने गहाण ठेवून गोरगरिबांसाठी एक महिना मोफत जेवणाची व्यवस्था केली होती. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना यापूर्वी ७५ हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

सामान्य कुटुंबातून पुढे येत, कोणताही सामाजिक किंवा राजकीय वारसा नसताना स्वतःच्या जिद्द, मेहनत आणि ध्येयवेड्या वृत्तीच्या जोरावर त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागातून सामाजिक कार्याची सुरुवात करून त्यांनी व्यापक स्तरावर आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.

महिलांनी सामाजिक अडथळ्यांवर मात करून समाजासाठी केलेले योगदान गौरविणे आवश्यक आहे. कर्तृत्ववान महिलांचा सन्मान हा महिला सक्षमीकरणाचा आणि समानतेचा सकारात्मक संदेश देतो. किस्किंदा पांचाळ यांचा हा सन्मान त्यांच्या धाडस, संघर्ष आणि समाजसेवेप्रती असलेल्या निष्ठेचा गौरव असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तमानके सुभाष व भाऊसाहेब राऊत यांनी केले. जिल्हाध्यक्ष प्रसाद गडकर यांनी मार्गदर्शन केले तर आभार प्रदर्शन आदिनाथ भालेकर यांनी केले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी