पाटोद्यात जोरदार वादळाचा तडाखा; अनेक घरांवरील पत्रे उडून नुकसान पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करा नागरिकांची मागणी
पाटोदा (प्रतिनिधी )पाटोदा शहरासह परिसरात आलेल्या जोरदार वादळ व वाऱ्यामुळे अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे संसार उघड्यावर आले असून काही ठिकाणी झाडे व वीजतारा पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.वादळामुळे विशेषतः कच्ची घरे व पत्र्याच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबांचे घरावरील पत्रे उडून गेल्याने पावसात घरात पाणी साचले असून जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.स्थानिक नागरिकांनी सांगितले की, अचानक आलेल्या वाऱ्यामुळे काही मिनिटांतच घरांची पत्रे उडून गेली. गरीब व सर्वसामान्य कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने पाहणी करून मदत करावी, अशी मागणी होत आहे.दरम्यान महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी व शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
Comments
Post a Comment