बेलेश्वरवस्तीवरील महिलांनी लेकराबाळांसह गाठले तहसील कार्यालय; रस्ता मोकळा करून देण्याची मागणी
बेलेश्वरवस्तीवरील महिलांनी लेकराबाळांसह गाठले तहसील कार्यालय; रस्ता मोकळा करून देण्याची मागणी
रस्ते अडवणाऱ्यांवर कारवाईच्या घोषणा केवळ कागदावरच; डॉ. गणेश ढवळे यांचा आरोप
लिंबागणेश( दि.३०) : बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील मुळुकवाडी ग्रामपंचायत अंतर्गत २०० लोकसंख्या असलेल्या बेलेश्वरवस्तीवरील महिलांनी लेकराबाळांसह थेट बीड तहसील कार्यालय गाठून शेतरस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली. मुलांच्या शाळा, दवाखाना, बाजारहाट तसेच शेतीच्या कामांसाठी वापरला जाणारा रस्ता काही व्यक्तींनी अडवल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) व शेख युनूस उपस्थित होते. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी सकारात्मक भूमिका घेत मंडळ अधिकारी उज्ज्वला राऊत व तलाठी गणपत पोतदार यांना तातडीने स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले.
शेतरस्ता बंद झाल्यामुळे पेरणीपूर्व मशागत, खत-बियाणे वाहतूक तसेच दैनंदिन ये-जा यामध्ये अडथळे निर्माण होत असल्याने रस्ता तातडीने मोकळा करून द्यावा, अशी मागणी बालासाहेब ढास, सदाशिव ढास, महादेव ढास, लक्ष्मण ढास, अभिमान ढास, रंजित ढास, बाळू ढास, मल्हारी ढास, जबाबदारी ढास, मंगल ढास, लताबाई ढास, सोयराबाई ढास, पुष्पा ढास, रत्ना ढास, संजना ढास, कालिदास ढास व विमलबाई ढास यांनी केली.
शेतरस्ते अडवणाऱ्यांवरील कारवाईच्या घोषणा पोकळ – डॉ. गणेश ढवळे
शेतकरी व शेतमाल वाहतुकीसाठी असलेले शेतरस्ते अडवणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची तसेच त्यांना शासकीय योजनांपासून वंचित ठेवण्याची शासनाने घोषणा केली आहे. फार्मर आयडी, आधार कार्ड ब्लॉक करणे, दंडात्मक कारवाई करणे व पुढील पाच वर्षे शासकीय योजनांचा लाभ न देण्यासारख्या तरतुदी जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र दिसत आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी सांगितले की, "शेतरस्ते अडवणाऱ्यांविरोधातील शासनाच्या घोषणा केवळ कागदोपत्री राहिल्या आहेत. प्रशासनाने अशा प्रकरणांमध्ये तातडीने कारवाई करून शेतकरी व ग्रामीण नागरिकांना न्याय द्यावा."
Comments
Post a Comment