त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन; श्रामनेरांचा सत्कार



बीड | प्रतिनिधी
त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त आज दि. २७ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बीड बसस्थानकाजवळील बुद्ध विहार येथे दि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया, शाखा जि. बीड (प.) यांच्या वतीने अभिवादन सभा आयोजित करण्यात आली. यावेळी मुंबई येथील ऐतिहासिक चैत्यभूमी येथे आयोजित विशेष श्रामनेर प्रशिक्षण शिबिरात सहभागी होऊन श्रामनेर झालेल्या बीड जिल्ह्यातील श्रामनेरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु. महालिंगदादा निकालजे होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आयु. बापू निकाळजे यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून दि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राज्य संरक्षण सचिव अमरसिंह ढाका, राज्य संघटक आयु. डी. एस. नरसिंगे, समता सैनिक दलाचे मेजर जनरल राजाभाऊ आठवले, महिला विभाग बीड जिल्हा (प.) अध्यक्षा आयु. अरुणाताई निसर्गंध, माजी विभागीय सचिव आयु. निसर्गंध गुरुजी, माजी अध्यक्षा आयु. पद्मिनताई गायकवाड, माजी जिल्हाध्यक्ष आयु. विष्णू कांबळे, शिवाजीराव, अनिल डोळस, हिशोबनिस आयु. सोनवणे आप्पा, बीड तालुका संस्कार सचिव प्रा. खैमाडे सर, ता. वडवणी अध्यक्ष प्रा. प्रकाशराव खळगे, बौद्धाचार्य सोनवणे, पुज्य भंते प्रज्ञाबोधी, भंते अश्वघोष, श्रामनेर अमरसिंह ढाका, ॲड. हणुमंत कांबळे, अनिल बोराडे, कटके गुरुजी, निकाळजे गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी आदर्शांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. सामूहिक त्रिसरण व पंचशील ग्रहण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी विविध मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन करत धम्म, समता आणि सामाजिक बांधिलकी यावर विचार मांडले.

समता सैनिक दलाचे मेजर जनरल राजाभाऊ आठवले यांनी सर्व स्तरातील आजी-माजी सैनिक, पोलीस कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, युवक-युवती तसेच एनसीसी विद्यार्थ्यांनी समता सैनिक दलाचा गणवेश परिधान करून २० मार्च २०२७ रोजी होणाऱ्या समता सैनिक दलाच्या शताब्दी संचालनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

प्रमुख मार्गदर्शक आयु. डी. एस. नरसिंगे यांनी धम्मकार्य हे कुशल कर्म असल्याचे सांगत धम्म सदाचारात रूजणे व समाजात समतेची भावना वाढविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. “धम्मात शोषण, भेदभाव व विषमतेला स्थान नाही. पद, प्रतिष्ठा आणि लोभाच्या अपेक्षेने केलेले कार्य म्हणजे तृष्णा असून त्यातून दुःख निर्माण होते. धम्मकार्य निःपक्ष, पारदर्शक आणि निर्भयपणे करणे गरजेचे आहे,” असे त्यांनी सांगितले.

तसेच “श्रामनेर म्हणजे श्रम करणारा. प्रज्ञा, शील, करूणा आणि मैत्री या तत्वांचा स्वीकार करून जगणे म्हणजे धम्म होय. अज्ञान, अंधानुकरण आणि अविद्या हे विकारांचे मूळ स्त्रोत आहेत. त्यामुळे अष्टांगिक मार्गाचा स्वीकार करून तृष्णामुक्त जीवन जगण्यातच खरी शांती, समता आणि सौख्य आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

मुंबई येथील ऐतिहासिक चैत्यभूमी येथे १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान पार पडलेल्या विशेष प्रशिक्षण शिबिरात मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. प्रकाशराव खळगे यांनी केले. सामूहिक सरणत्रय ग्रहण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी