आष्टी पंचायत समितीचा भोंगळ कारभार; अल्टिमेटम संपत आला तरी प्रशासन सुस्त, तरुणाचा पुन्हा उपोषणाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सुरज काकडे यांनी दिली आहे
आष्टी पंचायत समितीचा भोंगळ कारभार; अल्टिमेटम संपत आला तरी प्रशासन सुस्त, तरुणाचा पुन्हा उपोषणाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सुरज काकडे यांनी दिली आहे
आष्टी (प्रतिनिधी):
आष्टी पंचायत समितीमधील कथित भ्रष्टाचार आणि ढिसाळ कारभाराविरोधात प्रशासनाला दिलेला आठ दिवसांचा अल्टिमेटम आता संपत आला आहे. मात्र, अद्यापही भ्रष्ट व्यवस्थेने या तक्रारीवर लेखी किंवा तोंडी कोणत्याही प्रकारचे निवेदन न दिल्यामुळे, लोकशाही मार्गाने लढणाऱ्या तरुणांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. 'अधिकारी हे समाजाचे नोकर आहेत हे विसरले असून, शेतकऱ्यांच्या प्रत्येक कामासाठी पैशांची मागणी केली जाते,' असा घणाघाती आरोप करत या व्यवस्थेविरोधात पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे.
प्रत्येक टेबलावर पैशांची मागणी; शेतकरी हवालदिल
आष्टी पंचायत समितीमध्ये सर्वसामान्य शेतकरी आणि ग्रामस्थांची प्रचंड पिळवणूक होत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांचे वैयक्तिक प्रश्न असो की विहीर मंजुरी, शेततळे मंजुरी, घरकुल मंजुरी किंवा मस्टर भरणे आणि कामाची मागणी करणे— प्रत्येक कामासाठी इथे वेगवेगळ्या टेबलावर उघडपणे पैशांची मागणी केली जाते, असा खळबळजनक आरोप तक्रारदाराने केला आहे. जोपर्यंत पैसे दिले जात नाहीत, तोपर्यंत सामान्य शेतकऱ्याचे कोणतेही काम या ठिकाणी केले जात नाही, ज्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
तक्रारी जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचूच दिल्या जात नाहीत
तालुक्यातील कित्येक ग्रामपंचायतींमधील भ्रष्टाचाराचे तक्रारी अर्ज हे जिल्हा परिषद बीडकडे दाखल सुद्धा होऊ दिले जात नाहीत, असाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गटविकास अधिकारी (BDO) हे आपले मूळ कर्तव्य आणि काम पूर्णपणे विसरून गेले असून, या भोंगळ कारभारामुळेच भ्रष्ट व्यवस्था निर्धास्तपणे चालत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. एखाद्या अधिकाऱ्याने खुर्चीवर बसल्यानंतर आपण जनतेचे सेवक आहोत याचे भान ठेवावे, अशी आठवण आता प्रशासनाला करून देण्याची वेळ आली आहे.
विस्तार अधिकाऱ्यांचे 'ते' आश्वासन हवेत विरले?
याच भ्रष्ट कारभाराविरोधात दिनांक ०८/०५/२०२६ रोजी आष्टी पंचायत समितीसमोर उपोषण सुरू करण्यात आले होते. त्यावेळी गटविकास अधिकारी दुसऱ्या कामासाठी बाहेर गेले असल्याने, त्यांचा पदभार सांभाळणारे विस्तार अधिकारी यांनी मध्यस्थी केली होती. त्यांनी 'भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर आठ दिवसांत मागण्या पूर्ण करून योग्य ती कार्यवाही करू' असे लेखी आव्हान व आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले होते
तर पुन्हा पंचायत समितीच्या दारात ठिय्या
प्रशासनाने दिलेल्या आठ दिवसांच्या मुदतीपैकी आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. तरीही अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा उत्तर मिळालेले नाही. "पंचायत समितीच्या दारात पाऊल ठेवले तरी इथल्या भ्रष्ट व्यवस्थेची चिड येते," अशी उद्विग्न भावना व्यक्त करत, उर्वरित दोन दिवस संपताच पुन्हा तेवढ्याच ताकदीने आणि पूर्वतयारीने पंचायत समितीच्या दारात उपोषणाला बसणार असल्याचा इशारा तक्रारदाराने दिला आहे. या आंदोलनामुळे आता आष्टी तालुक्यात प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Comments
Post a Comment