एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार लिंबागणेश येथे एसटी बस बंद पडल्याने प्रवाशांचे हाल,वाहतूक विभाग मात्र बेफिकीर
एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार लिंबागणेश येथे एसटी बस बंद पडल्याने प्रवाशांचे हाल,वाहतूक विभाग मात्र बेफिकीर :- डॉ.गणेश ढवळे
लिंबागणेश (दि.१७) : राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हे एसटी प्रवाशांच्या सोयीसाठी विविध योजनांचा जाहिरातीद्वारे गाजावाजा करत असताना प्रत्यक्षात मात्र प्रवाशांच्या हालअपेष्टांकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आले आहे.
रविवार दि.१७ रोजी वसई–अंबेजोगाई ही एसटी बस सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास लिंबागणेश येथील बसस्थानकावर तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. अचानक बस बंद पडल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले असून तब्बल तीन तासांपासून प्रवासी अडकून पडले आहेत.
वाहन चालकाने तत्काळ पाटोदा आगारप्रमुखांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. मात्र “मेकॅनिक रात्री ११ वाजता येईल, त्यानंतरच दुरुस्ती केली जाईल,” असे उत्तर मिळाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे पर्यायी बस व्यवस्था किंवा तत्काळ मदत उपलब्ध करून देण्याबाबत आगार प्रशासनाकडून कोणतीही तत्परता दाखविण्यात आली नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला.
दरम्यान, डॉ . गणेश ढवळे, पत्रकार हरिओम क्षीरसागर यांनी बीड विभागप्रमुख अनुजा दुसाने यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधल्यानंतर त्यांनी लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दिली.
“एसटी महामंडळ प्रवाशांच्या सेवेसाठी आहे की त्यांची गैरसोय करण्यासाठी, असा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारू लागले आहेत. ग्रामीण भागातील प्रवाशांना तासन्तास अडकवून ठेवणे ही अत्यंत असंवेदनशील बाब आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment