महावितरणची मान्सुनपूर्व दुरुस्ती व देखभाल मोहीम कागदावरच; ग्रामीण भागात लोंबकळणा-या तारांमुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात :- डॉ. गणेश ढवळे
महावितरणची मान्सुनपूर्व दुरुस्ती व देखभाल मोहीम कागदावरच; ग्रामीण भागात लोंबकळणा-या तारांमुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात :- डॉ. गणेश ढवळे
लिंबागणेश (दि.१९) : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून मान्सुनपूर्व दुरुस्ती आणि देखभाल मोहीम राबविण्यात येत असल्याचा दावा केला जात असला, तरी ग्रामीण भागात ही मोहीम प्रत्यक्षात केवळ कागदोपत्रीच सुरू असून महावितरणचा ढिसाळ कारभार सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केला आहे.
अनेक ठिकाणी लोंबकळणाऱ्या किंवा तुटलेल्या वीजतारांमुळे ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे. रस्त्यावर किंवा घरांच्या अगदी जवळ आलेल्या वीजतारांमुळे निष्पाप नागरिकांचे बळी गेले असून, अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे जीर्ण झालेल्या कमकुवत तारा रस्त्यावर पडून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. काही भागांत वीजतारा माणसांच्या उंचीपर्यंत खाली आल्याने लहान मुले व जनावरांना विजेचा धक्का लागण्याच्या घटनाही घडत असल्याची खंत डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केली आहे.
महावितरणकडून पावसाळ्यापूर्वी तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी वीज खांब, ट्रान्स्फॉर्मर व वीजतारा सुरक्षित ठेवणे, वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे, जुने पीन व डिस्क इन्सुलेटर्स बदलणे, गंजलेले किंवा वाकलेले खांब बदलणे, उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, ऑईल फिल्टरेशन, वितरण बॉक्स दुरुस्त करणे तसेच उच्च व कमी दाबाच्या लाईन्सची देखभाल करणे आदी कामे केली जातात.
मात्र, अनेक ठिकाणी वीजतारांना लागून झाडांच्या फांद्या अद्यापही धोकादायक स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. मुसळधार पाऊस किंवा वादळाच्या वेळी या फांद्या वीजवाहिन्यांवर पडून मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ३० मेपूर्वी सर्व मान्सुनपूर्व दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले असून कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
तरीदेखील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी प्रत्यक्ष कामे होत नसल्याने वरिष्ठांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवली जात असल्याची टीका डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे. पावसाळ्यात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा टाळण्यासाठी तातडीने प्रभावी दुरुस्ती मोहीम राबवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Comments
Post a Comment