पुस्तक न वाचता धमकी; संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करा - नितीन सोनवणे
पुस्तक न वाचता धमकी; संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करा - नितीन सोनवणे
‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाच्या प्रकाशकांना जीवे मारण्याची धमकी
बीड प्रतिनिधी- दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी १९८८ मध्ये लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या कोल्हापूर येथील प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची, घरात घुसून मारण्याची आणि “पानसरेंना भेटायला वर जा” अशी थेट धमकी दिल्याचा ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली असून, विचारस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.प्रकाशक प्रशांत आंबी यांनी सांगितले की, गायकवाड यांनी रात्री उशिरा फोन करून पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेतला. “शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख अनादरकारक आहे,” असे म्हणत त्यांनी अत्यंत खालच्या भाषेत शिव्या दिल्या आणि “तुझी जीभ कापेन, घरात घुसून मारेन, तूही पानसरेंना भेटशील” अशा धमक्या दिल्या. संभाषण सुमारे ९ मिनिटे चालले. गायकवाड यांनी ऑडिओ क्लिप आपलीच असल्याचे मान्य केले, हे पुस्तक ३७ वर्षांपूर्वी प्रकाशित झाले असून, महाराष्ट्रात लाखो वाचकांनी ते वाचले आहे. त्यात शिवाजी महाराजांच्या सेक्युलर, जनकल्याणकारी आणि समतावादी पैलूंचा उल्लेख आहे. फक्त शीर्षक पाहून पुस्तक न वाचता धमकी देणे हा दादागिरीचा प्रकार असल्याचे पुरोगामी संघटनांनी म्हटले आहे. *नितीन सोनवणे यांनी केला निषेध* :
“ही केवळ एका प्रकाशकाची समस्या नाही, तर विचारस्वातंत्र्यावर आणि लोकशाही मूल्यांवर थेट हल्ला आहे. पुस्तक वाचण्याची इच्छा नसताना फक्त शीर्षकावरून धमकी देणे हा गुंडगिरीचा प्रकार आहे. आमदार असूनही अशी भाषा वापरणे लोकशाहीसाठी घातक आहे. विचारांची लढाई विचारांनी, चर्चेने आणि तर्काने लढावी, दडपशाहीने नव्हे,” असे बीडचे सामाजिक कार्यकर्ते नितीन सोनवणे यांनी म्हटले. त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि गृहखात्याने तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी केली. “देश आणि बहुजन समाजाने यावर तीव्र आवाज उठवला पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही सर्वोच्च आहे,” असेही त्यांनी आवाहन केले. पुरोगामी नेते आणि पानसरे कुटुंबीयांनी धमक्या विचारांना उत्तर देऊ शकत नाहीत, असे सांगितले.
विरोधी पक्षांकडून ‘लोकशाही की गुंडशाही?’ असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्र सरकारला जबाबदार धरले जात आहे.
सोनवणे यांनी गायकवाड यांच्या भाषेला ‘अशोभनीय’ आणि ‘आमदारकीला डाग लावणारे’ म्हटले.
‘शिवाजी कोण होता?’ हे छोटेसे विचारप्रवर्तक पुस्तक आजही प्रासंगिक मानले जाते. मात्र, शीर्षकावरून वादंग निर्माण होणे आणि धमक्या देणे याला नितीन सोनवणे यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्या विरोधी कृत्य म्हटले आहे.
Comments
Post a Comment