बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीविरोधात कृती समितीचे निवेदन; निनावी पत्रप्रकरणी कठोर कारवाईची मागणी; जिल्हा बदनामी करण्याचे षडयंत्र

बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीविरोधात कृती समितीचे निवेदन; निनावी पत्रप्रकरणी कठोर कारवाईची मागणी; जिल्हा बदनामी करण्याचे षडयंत्र:- डॉ.गणेश ढवळे 
बीड (दि.१७) : बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जाळपोळ प्रकरणांसह गंभीर गुन्ह्यांवर ठोस कारवाई करण्याची मागणी बीड जिल्हा कृती समितीने केली आहे. तसेच निनावी पत्रांच्या माध्यमातून प्रशासनाविषयी अविश्वास निर्माण करण्याच्या प्रकारावर तातडीने कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

गेल्या अडीच वर्षांपासून जिल्हा सामाजिक अस्वस्थतेच्या छायेत वावरत असून, जाळपोळ प्रकरणांमध्ये अपेक्षित ती प्रभावी कारवाई झालेली दिसून येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.

दरम्यान, अलीकडील काळात खून, दरोडे, अत्याचार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, निनावी पत्रांच्या माध्यमातून समाजात भीती व संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार वाढत असल्याचे निदर्शनास आणून देत, अशा प्रकरणांचा तांत्रिक पद्धतीने तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

जिल्ह्याची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची शक्यता व्यक्त करत, जाळपोळ व इतर गंभीर गुन्ह्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बीड जिल्हा कृती समिती सदस्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, रामनाथ खोड,शेख युनुस,माजी सैनिक अशोक येडे, बाळासाहेब मोरे पाटील,रामधन जमाले,सय्यद सादेक, सुहास जायभाये, किष्किंधा पांचाळ यांच्या 
वतीने करण्यात आली आहे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी